लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका..! जालन्यातील मराठा युवकाची मुंबईत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:59 PM2023-10-19T12:59:04+5:302023-10-19T12:59:36+5:30
यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा असं विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज करत आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय की, आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असं आवाहन त्यांनी केले आहे.
त्याचसोबत यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे असा इशाराही विनोद पाटील यांनी सरकारला दिला आहे.
आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुनील कावळे राहायला होते. मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आहेत. हा युवक मंगळवारी रात्री मुंबईत आला होता. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री त्याने बीकेसी परिसरात आत्महत्या केली आहे याबाबत पोलिसांनी पुष्टी दिल्याचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. तसेच युवकांनी असे पाऊल उचलू नये. ही लढाई युवकांसाठी लढली जात आहे. राज्य सरकारने २४ तारखेच्या डेडलाईनपर्यंत थांबणेही गरजेचे नाही. त्याआधीही तोडगा काढू शकला जाऊ शकतो. अशाप्रकारे तरुणांनी आत्महत्या केली तर त्यातून जे काम करतायेत त्यांचेही खच्चीकरण होते असं त्यांनी म्हटलं आहे.