मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपाला इशारा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मुंबईत मराठा युवा क्रांती मोर्चाकडून ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
'हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा', असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाला 99 जागा मिळाल्या.पण भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाला 150 जागा मिळतील असं भाकित वेळोवेळी केलं होतं. त्यामुळे मराठी युवा क्रांती मोर्चाकडून अशा प्रकारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
गुजरातमध्ये काँग्रेसने 80 जागा जिंकल्या. इतर उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती.