मुंबई- राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यात काही ठिकाणी काल जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ झाली. तसेच आता राजकीय वर्तुळातुनही प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनीही सरकारला इशारा दिला आहे.
... म्हणून जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार; राज्यभर तीव्र आंदोलन
एका कार्यक्रमात बोलताना आमदार सुहास कांदे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. यावेळी आमदार कांदे म्हणाले, मी कोणत्याही जातीवर बोलणार नाही, मराठा समाजातील मुलांवर अन्याय होत आहे. शिकुनही शेवटी शेतीच करावी लागत असेल तर मराठी तरुणांनी काय करायचे. म्हणून मी स्वत: मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीला बोलावलं आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर चांगला निर्णय होईल. जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटत नाही आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गावात जाणार नाही. वेळ पडली तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये यांना आग लावण्याचे प्रकार घडल्याचे दिसत आहेत. तर, काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने अन्न-पाणी सोडले होते. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा समाज बांधवांनी सातत्याने विनंती केल्यामुळे सोमवारी त्यांनी पाणी प्यायले होते. आता, पुन्हा एकदा त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे, त्यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाज आक्रमक झाला असून नेतेमंडळींना फोन करुन राजीनामा देण्याची मागणी करत आहे. एका आंदोलकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना थेट फोन करत, मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.