मराठी आठव दिवस या मासिक उपक्रमाचा उद्यापासून वर्षपूर्ती सोहळा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 23, 2023 03:45 PM2023-06-23T15:45:40+5:302023-06-23T15:45:50+5:30

स्वामीराज प्रकाशन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

Marathi Aathav Divas Anniversary Celebration from Tomorrow | मराठी आठव दिवस या मासिक उपक्रमाचा उद्यापासून वर्षपूर्ती सोहळा

मराठी आठव दिवस या मासिक उपक्रमाचा उद्यापासून वर्षपूर्ती सोहळा

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वामीराज प्रकाशन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने " मराठी आठव दिवस" या मासिक उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळा रविवार दि,२५ जून पासून सुरू होत आहे. रविवारी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे " पूर्वरंग " प्रारंभ सोहळा संपन्न होणार असून ' गोकुळ ' चे अध्यक्ष अरुण डोंगळे हे प्रमुख अतिथी तर विख्यात साहित्यिक ' पानिपत ' कार विश्वास पाटील अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणार आहेत. साहित्यिक डॉ. महेश केळुसकर आणि अभिनेता सुशांत शेलार यांचीही खास उपस्थिती असेल. यावेळी " मुंबईची देवी संस्थाने - एक परिक्रमा ' या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून मराठीसाठी कार्य करणाऱ्या पै फ्रेंड्स लायब्ररी आणि महाराष्ट्र मित्र या दोन संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजोपयोगी कार्य करणाऱ्या पाच ध्यासमुर्ती महिलांचा यावेळी " नवदुर्गा " पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. यानंतर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर " सुर सम्राट" ही हिंदी सिनेसृष्टी गाजवलेल्या मराठी संगीतकारांची संगीत गाथा सादर करतील.

सोमवार दि,२६ जून रोजी सायंकाळी ६ पासून कविता उत्सव होणार असून रामदास फुटाणे, अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर यांच्यासह इंद्रजित घुले, डॉ. सतीश कानविंदे, सबी परेरा यांचे " मस्करिका"  हे कवी संमेलन, व्हिजन निर्मित " ती च्या कविता" हा अभिवाचन प्रयोग आणि शब्दाक्षर  निर्मित किरण येले यांच्या कवितांवर आधारित " स्त्री, जातं, ओवी आणि कविता " हा दीर्घांक सादर होईल.

मंगळवार दि,२७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे नमन नटवरा निर्मित " महाराष्ट्र भूमी बहुगुणी" हा लोकसंस्कृती दर्शनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

बुधवार दि, २८ जून रोजी शिवाजी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित " कीर्तनाची डबल बारी" ने या पूर्वरंग सोहळ्याची सांगता होणार आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि हभप मुक्ताताई महाराज चाळक व हभप शिवानीताई महाराज चाळक यात सहभागी होतील.

सर्व मराठी बांधवांनी या पूर्वरंग सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे आणि पूजा राणे व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केले आहे.

Web Title: Marathi Aathav Divas Anniversary Celebration from Tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई