Join us

“शरद पवार समाजाची जाण, भान असणारे नेते, पण...”; किरण मानेंनी लिहिलेले पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 2:46 PM

Kiran Mane Letter To Sharad Pawar: पहिल्यांदाच तुम्हाला खुले पत्र लिहितोय. तुमच्यापर्यंत पोहोचावे ही अपेक्षा. या खुल्या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा बाळगतो, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

Kiran Mane Letter To Sharad Pawar: अभिनेते किरण माने सातत्याने घडणाऱ्या घडामोडींवर, राजकीय विषयांवर खुलेपणाने, स्पष्ट शब्दांत मते मांडत असतात. राज्यातील तसेच देशातील घटनांवर तीव्र भाषेत प्रतिक्रिया येत असतात. सत्ताधाऱ्यांना अधूनमधून चिमटे काढत असतात. यातच आता किरण माने यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना एक खुले पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. किरण माने यांनी शरद पवार यांना खुले पत्र लिहिण्याचे कारण काय? किरण माने यांनी लिहिलेले पत्र वाचा जशाच्या तसे...

मा. शरद पवारसाहेब,

सप्रेम नमस्कार.

पहिल्यांदाच तुम्हाला खुले पत्र लिहितोय. तुमच्यापर्यंत पोहोचावे ही अपेक्षा.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या उल्लेखावरून आपल्या 'रयत शिक्षण संस्थे'तील प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांना भोगावा लागलेला छळ, त्यांनी दिलेला लढा आणि प्रचंड संघर्ष करून न्यायालयात मिळवलेला विजय याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. महाराष्ट्रातील खडा न खड्याची खबरबात असलेले तुम्ही, तुम्हाला मी याविषयी काय सांगणार? पण...बहुतेक एक धक्कादायक गोष्ट तुमच्या नजरेतून सुटली आहे - मृणालिनीताईंना अजूनही 'न्याय' मिळालेलाच नाही!

गृहमंत्रालयानं न्यायालयाचे आदेश तुर्तास तरी धुडकावले आहेत, असं चित्र आहे. त्यांच्याकडून फार वेगळी अपेक्षा नव्हतीच... पण आपल्या रयत शिक्षण संस्थेनंही न्यायसंस्थेच्या या आदेशाची दखल घेऊन कारवाई मागे घेण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, हे फार वेदनादायक आहे.

ए.पी.आय. गर्जे यांनी आहेर मॅडम विरुद्ध दिलेले बेकायदेशीर पत्र मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पण निकाल लागून महिना होत आला तरी पोलिस खात्यानं किंवा गृहमंत्रालयानं हे पत्र त्यांना मागं घ्यायला लावलेलं नाही. अर्थात महाराष्ट्रावर लादले गेलेले निष्क्रीय गृहमंत्री यावर बोलणार नाहीत... पण रयत शिक्षण संस्था!?!?

रयत शिक्षण संस्थेकडेही न्यायालयाच्या या निकालाची प्रत गेली आहे. संस्थेनं तिला काडीचीही किंमत दिलेली नाही ! कदाचित तुम्ही याविषयी अनभिज्ञ असाल. आता या पत्रानंतर तरी तुम्ही कारवाई मागे घेण्यासाठी तातडीनं सुत्रं हलवावीत. एका निडर शिक्षिकेनं मस्तवाल वर्चस्ववाद्यांशी लढा देऊन जिंकलेली ही लढाई पुन्हा हरली तर तुम्हालाही ही जनता माफ करणार नाही.

आम्ही तुमच्याकडे पुरोगामी विचारांचा संवेदनशील नेता म्हणून आशेनं पहातो. ती प्रतिमा या एका प्रकरणात उद्ध्वस्त होईल...कारण आज सगळीकडे अराजक माजलं आहे. संविधानाची मुल्यं राजरोसपणे पायदळी तुडवली जात आहेत. 'सांस्कृतिक दहशतवाद' आणि 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या दोन मुद्यांवर परखडपणे बोलल्यामुळे गेल्या दहा वर्षांत कितीतरी जणांनी हातातले काम, नोकर्‍या गमावल्या आहेत. कितीतरी जण अर्वाच्य शब्दांत रोज ट्रोल होतात. काहीजणांचे जीवही गेले आहेत. अशा भवतालात या भगिनीने जीव धोक्यात घालून, झगडून मिळवलेल्या विजयाचं मोल खुप मोठं आहे.

छ. शिवरायांच्या खर्‍या विचारांच्या प्रसारासाठी लढा देताना, कर्मवीर अण्णांनी 'बहुजनां'च्या उद्धारासाठी स्थापन केलेली संस्थाच पाठीशी उभी रहात नसेल तर सर्वसामान्य जनतेनं न्यायासाठी कुणाकडे पहायचं?

पवारसाहेब, आपण समाजाची जाण आणि भान असणारे नेते आहात. कर्मवीर अण्णांच्या 'रयत'ने या भगिनीला तिच्या हक्काचा न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही समजून जाऊ की, छत्रपती शिवरायांची 'रयत' पुन्हा एकदा पेशवाईच्या विळख्यात अडकली आहे... विद्या मिळवूनही 'शुद्र खचतील' आणि 'अनर्थ होईल'.

या खुल्या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा बाळगतो. नाही झाला तरी आपला आदर ठेवून सांगतो की स्वबळावर लढायची जिद्द आम्हाला शिवशाहुफुलेआंबेडकरांनी दिलेली आहे. कर्मवीर अण्णांची आक्रमकताही आमच्यात आहे. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून हा पत्रप्रपंच.

जय शिवराय... जय भीम... जय कर्मवीर.आपला नम्र.

- किरण माने.

टॅग्स :किरण मानेशरद पवार