मराठी कलावंतांनी घातली निसर्गाला साद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:21+5:302021-06-06T04:06:21+5:30

राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक मराठी कलावंतांनी पर्यावरणाशी एकरूपता साधत निसर्गाला साद ...

Marathi artists call nature! | मराठी कलावंतांनी घातली निसर्गाला साद !

मराठी कलावंतांनी घातली निसर्गाला साद !

Next

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक मराठी कलावंतांनी पर्यावरणाशी एकरूपता साधत निसर्गाला साद घातली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारचा पर्यावरण दिन अनेक कलावंतांनी समाजमाध्यमावरच साजरा केला.

कलाकारांनी पर्यावरणविषयक पोस्ट टाकत लेखन, छायाचित्रे, आठवणी, व्हिडिओ अशा विविध माध्यमातून पर्यावरणाशी जवळीक साधली. ‘हे तुमचे नाही, माझेही नाही, हे आपले सर्वांचे आहे. त्यामुळे निसर्गाचे शक्य होईल तितके रक्षण करा’, असा संदेश अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने समाजमाध्यमावर दिला. ‘दरवर्षी आम्ही आमच्या घरी जवळपास २५ नवीन झाडे लावतो. निसर्गाला मी माझा सर्वांत जवळचा मित्र मानते. माझ्या मुलाचाही झाडे लावणे हा आवडता छंद आहे. त्यामुळे माझे घर जणू हिरव्या पाचूने नटले आहे’, अशा शब्दांत अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी पर्यावरणविषयक भूमिका मांडली.

अभिनेते संजय कुलकर्णी यांनी तर संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांची पर्यावरणासंबंधी एक कविताच शेअर केली. ‘एका कवीने कविता लिहिलीच नाही, कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर, कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक झाड लावू असं ठरविले त्याने’; अशी सुरुवात असलेल्या या कवितेला नेटकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभला, तर ‘काळाची गरज म्हणून प्रत्येक हात मातीत माखलाच पाहिजे. किमान एक झाड रुजलंच पाहिजे’, असा संदेश अभिनेता निनाद शेट्ये याने दिला.

दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी दोन वर्षांपूर्वी योगायोगाने पर्यावरण दिनालाच आलेल्या वटपौर्णिमेला अंगणात लावलेल्या वडाच्या रोपट्याची आठवण जागविली. हे झाड आता दहा फूट उंच झाले आहे आणि हळूहळू तो सावली देणारा वृक्ष बनत चालला आहे. जागोजागी मी अशी खूप झाडे लावत असते, तुम्हीही लावा; असा संदेशही त्यांनी दिला.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिचा आवडता व्यायाम प्रकार असलेला योग, निसर्गाच्या सान्निध्यात करतानाचा व्हिडिओ शेअर करीत तिच्या चाहत्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेते सागर तळाशीकर यांनी कोरोना प्रादुर्भावाचा संदर्भ घेत वास्तवदर्शी टिपण लिहिले. ‘मुलं ही देवाघरची फुलं, असं म्हटलं जातं. या फुलणाऱ्या फुलांच्या आयुष्यात फुलणं एक वेळ जाऊ द्या; किमान कोमेजून जाण्यासाठी दोन वर्षे उमलणंसुद्धा जमलं नाही. मानवानं नैसर्गिक पर्यावरणाबरोबरच या निरागस मानसिक पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची पण कसूर सोडली नाही’, अशा शब्दांतून त्यांनी मनातली व्यथा मांडली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Marathi artists call nature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.