नाणे डिझाइन स्पर्धेत मराठी कलाकारांची बाजी
By admin | Published: April 21, 2017 01:04 AM2017-04-21T01:04:38+5:302017-04-21T01:04:38+5:30
जपान शासनाच्या जपान टांकसाळ (खंस्रंल्ल ट्रल्ल३) आयोजित आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन स्पर्धा २०१६ साठी भारतातर्फे सहभागी झालेल्या मुंबई
मुंबई : जपान शासनाच्या जपान टांकसाळ (खंस्रंल्ल ट्रल्ल३) आयोजित आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन स्पर्धा २०१६ साठी भारतातर्फे सहभागी झालेल्या मुंबई टाकसांळमधील प्रसाद सुभाष तळेकर व आतिष प्रभाकर मंचेकर या दोन मराठी कलावंतांनी यश मिळवले आहे. संपूर्ण जगभरातून २२ देशांतील कलावंतांनी ९१ कलाकृती या स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या; यातून अंतिम फेरीत धडक मारत प्रसाद आणि आतिषने अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवून जगाच्या कॅनव्हासवर आपली मोहर उमटविली आहे.
या स्पर्धेत बाजी मारून प्रसादने २ लाख येन म्हणजे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे पारितोषिक तर आतिषने १ लाख येन म्हणजे सुमारे ६० हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे. भारताला जागतिक स्तरावर हा मान मिळवून दिल्याने या मराठमोळ्या कलाकारांचे कलाक्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन स्पर्धेत मराठी कलाकारांनी साकारलेल्या नाणे डिझाइनची जागतिक पातळीवर निवड होण्याची ही पहिलीच वेळ असून त्यातही भारतीय नाणे डिझाइनच्या इतिहासात प्रथमच प्रसाद तळेकर हा पुरस्कारासह पदक मिळविणारा पहिला भारतीय कलावंत ठरला आहे. या जागतिक नाणी परिषदेमध्ये दहापेक्षा अधिक देश आपली नाणी प्रदर्शित करणार आहेत. या दोन्ही कलावंतांनी साकारलेली ही नाणी २८ एप्रिल २०१७ रोजी टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणे परिषदेत प्रसिद्ध केली जाणार आहेत. या वेळी होणाऱ्या परिषदेत पारितोषिक वितरण समारंभात जपान मिंटच्या अध्यक्षांकडून तळेकर यांना पुरस्कार, पदक प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभासाठी तळेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रसाद तळेकर हा मुंबईच्या जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या शिल्पकला विभागाचा विद्यार्थी असून आतिष हा रहेजा स्कूल आॅफ आर्टचा विद्यार्थी आहे. या कलावंतांनी साकारलेल्या डिझाइनचे विषय हे भारतीय संस्कृतीवर आधारलेले असून प्रसाद तळेकर याने ‘खजुराहो : द टेम्पल आॅफ लव्ह’ या विषयावर तर आतिष याच्या कलाकृतीचा विषय ‘इंडियन क्लासिकल डान्स’ असा आहे. या नाणे डिझाइनच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचा गौरव झाला आहे. (प्रतिनिधी)