Join us

‘मराठी बाणा’मुळे मराठी संस्कृतीचे जगाला दर्शन झाले; शरद पवार यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 1:05 AM

२००० वा प्रयोग दिमाखात संपन्न

मुंबई : मराठी संस्कृती किती अभिमानास्पद आहे हे ‘मराठी बाणा’मुळे जगाला कळले. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याबद्दल संपूर्ण जगाला बुरगुंडा नक्की होईल, असे उद्गार शरद पवार यांनी काढले. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ‘मराठी बाणा’ या अशोक हांडे यांच्या कार्यक्रमाचा २००० वा प्रयोग नुकताच दिमाखात संपन्न झाला. या प्रयोगाला जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अनिल परबदेखील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, अशोक हांडे हे महाराष्ट्राच्या गावागावांत, घराघरांमध्ये वसलेली मराठी संस्कृती आणि कला जतन करणे व नव्या पिढीसमोर ती मांडणे हे अत्यंत मोलाचे कार्य करीत आहेत. त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे.

अनिल परब म्हणाले, १ नोव्हेंबर २००५ रोजी दिवाळी पहाटला झालेला मराठी बाणाचा शुभारंभाचा प्रयोग मी शेवटच्या रांगेतून पाहिला होता. जशी मराठी बाणाची प्रगती होत गेली तशी माझीही राजकारणातली प्रगती झाली. आज २००० वा प्रयोग पहिल्या रांगेत बसून पाहण्याचे भाग्य मला लाभले. आज-काल राजकारणात फुटीचे वारे आहे. परंतु हांडे यांच्या दीडशे कलाकारांच्या संचात अद्यापही कोणी त्यांना सोडून गेले नाही. याचं काय रहस्य आहे? याचा अभ्यास राजकारण्यांनी करायला हवा. मराठी बाणाच्या ५००० व्या प्रयोगालादेखील मी आवर्जून उपस्थित राहीन.

या वेळी जयंत पाटील यांनी सांगितले, गेली ३३ वर्षे सतत एखाद्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली हे लोकांसमोर मांडणे, नव्या पिढीने ते पाहणे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्या इतिहासाची जाणीव करून देणे. हे अवघड काम अशोक हांडे यांनी सहज साध्य केले आहे. त्यासाठी अंगात कला ठासून भरलेली असावी लागते. अशोक हांडे हे खऱ्या अर्थाने लोककलाकार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक हांडे यांना कौतुकास्पद पत्र लिहून पाठविले होते. विशेष म्हणजे या प्रयोगासाठी षण्मुखानंद सभा या संस्थेने आपले नाट्यगृह विनामूल्य उपलब्ध करून दिले होते. शेवटी अशोक हांडे यांनी सर्व रसिकांचे आभार मानले.

टॅग्स :शरद पवार