मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.मुंबईत सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. मात्र इतर भाषांबरोबरच मराठी भाषेचा सन्मान ठेवला पाहिजे, पार्ल्यात मराठीपण हे जपले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत राज्याचे परिवहन मंत्री व विभागप्रमुख अँड.अनिल परब व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार आज येथील दुकानबाहेर लावलेल्या गुजराती बॅनर बरोबरच मराठी बॅनर देखिल लावण्याची सूचना विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर व शिवसैनिकांनी केली.आणि दुकानदाराने देखिल सहकार्य करत गुजराती बरोबर दुकानाबाहेर तसाच मराठी बॅनर देखिल सन्मानाने लावला अशी माहिती नितीन डिचोलकर यांनी लोकमतला दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रभाग क्रमांक 85 मध्ये महात्मा गांधी रोड पार्लेश्वर मंदिरासमोर रसराज हे खाद्यपदार्थ विकण्याचे नव्याने दुकान सुरू करण्यात आले आहे. या दुकानाबाहेर फक्त गुजराती लिहिलेले बॅनर लावण्यात आले होते. सदर बाब 85 प्रभागाचे युवा सेनेचे शाखा अधिकारी संदीप लाड यांनी यांनी निदर्शनास आणली सदर दुकानात भेट देऊन जसा गुजराती बॅनर बनवण्यात आला आहे तशाच पद्धतीचा मराठी बॅनर सुद्धा बनवून लावण्यात यावा अशी सूचना या दुकानदाराला देण्यात आली. याप्रसंगी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख अनिल मालप,मुन्ना साबळे, रितेश रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.