मुंबई : मराठी भाषेच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले मराठी भाषा भवनचे मुख्य कार्यालय मुंबईत उभे राहणार असल्याची घोषणा केली. यासाठी महसूल विभागाने गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या जवाहर बाल भवन परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी अध्यादेशही काढला. मात्र, हे सगळे कागदोपत्री असल्याने दिग्गजांकडून याविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
नुकतेच जनस्थान पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटले. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मुंबईमध्ये मराठीचा टक्का ५२ टक्के होता. आज ४० वर्षांनंतर राज्याच्या राजधानीत मराठीचा टक्का २२ टक्क्यांवर आला आहे. देशातील सर्व भाषकांचे भाषा भवन मुंबईत आहे; पण मराठी भाषा भवन अजून होऊ शकले नाही, ही शोकांतिका आहे. याबाबत आजवरच्या अनेक सांस्कृतिकमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही शासनाची उदासीनताच दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. शासन कुणाचेही असो मराठीचा आदर सर्व जण व्यक्त करतात; परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही, असे सांगत त्यांनी शासनाच्या भूमिकेविषयी जाहीर नाराजी प्रकट केली.
राज्यात मराठी अस्मितेचे राजकारण करणारे सत्तेत असूनही मराठी भाषा भवनाचे काम पुढे सरकत नाही. यासाठी सरकार आग्रही असल्याचे दिसत नाही. मात्र, सत्ताधारी फक्त मतांसाठी मराठीचा आणि मराठी माणसाचा वापर करतात. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मराठीबद्दलची अनास्था आणि हिंदीबद्दलची जवळीक महाराष्ट्र, मुंबई आणि मराठीला एका भयानक भविष्याकडे ओढून घेऊन जात आहे, हे वास्तव डोळ्यासमोर आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.