मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:05 AM2020-02-28T01:05:12+5:302020-02-28T01:05:49+5:30

सोशल मीडियावर मराठीचे गोडवे सांगणाऱ्या पोस्ट

marathi bhasha din celebrated in mumbai | मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात

मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात

Next

मुंबई : कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन, शाळा व महाविद्यालयांत खास कार्यक्रम, काव्य संमेलन, रेल्वे स्थानकांवर मराठी कविता-गाणी, व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर मराठी भाषेचे गोडवे सांगणाºया पोस्टी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुरुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तथा मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

गुरुवारी विकिपीडियाच्या वतीने आरोग्य क्षेत्राची मराठीत माहिती देणाºया ‘स्वास्थ्य’ या मराठी संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील स्थानकांवर मराठी कविता-गाणी यांची उद्घोषणा करण्यात आली. याखेरीज, पालिका शाळा आणि मराठी शाळांमध्ये लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत मराठीचा गजर केला. ग्रंथदिंडी काढून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.

त्याचप्रमाणे सायंकाळी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रात आणि भाषा संवर्धनात योगदान देणाºया असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ‘लोकसाहित्य-उत्सव मराठीचा’ ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यानुसार लोकसाहित्याच्या प्रचार व प्रसाराकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करणे, पुस्तके व कोश यांबाबत चर्चा, परिसंवाद, व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

वांद्रेत मराठी भाषा दिन उत्साहात
मराठी भाषा दिनानिमित्त वांद्रे पश्चिम येथील सेंट टेसेसा बॉईज हायस्कूलमध्ये सकाळी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, भवानीमाता आदी व्यक्तिरेखा साकार केल्या. पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीच्या निर्णयाचे स्वागत शाळेने केले, अशी माहिती येथील शिक्षक गणेश हिरवे यांनी दिली.
मराठी भाषा दिनानिमित्त चेंबूर स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम
मराठी भाषादिनानिमित्त मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी या मोहिमेत अनेक नागरीकांनी सहभाग घेतला. यावेळी चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर लावण्यात आलेल्या मोठ्या फलकावर सर्व नागरिकांनी मराठीत स्वाक्षरी केल्या.

सोशल साइटवरही जयघोष
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा विविध सोशल साइटवरही गुरुवारी दिवसभर मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देणाºया असंख्य पोस्ट टाकण्यात येत होत्या. यात मराठी साहित्यिक, मराठी कविता, गाणी, व्हिडीओ अशा विविध माध्यमांतील पोस्ट्स नेटिझन्स शेअर करताना दिसून आले.

सीएसएमटीवर समूह नृत्य करून मराठी दिन साजरा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे समूह नृत्य (फ्लॅश मॉब) करून मराठी दिन साजरा केला. समूह नृत्यामध्ये मराठी गाण्यांचा समावेश होता. याद्वारे तरुण-तरुणींनी काही मिनिटांसाठी समूह नृत्य सादर केले. यासह मनसे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषा दिनानिमित्त मराठीत स्वाक्षरी अभियान करण्यात आले.

Web Title: marathi bhasha din celebrated in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.