Join us

Marathi Bhasha Din : शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा 'आपली मराठी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 1:01 PM

Marathi Bhasha Din : मराठी ही शक्तीची अन् भक्तीची भाषा आहे. इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं,

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात 'मराठी भाषा दिन' कार्यक्रमात मराठी भाषेची परंपर, संस्कृती, वारसा आणि जतन यावर भाष्य केलं.  आज या कार्यक्रमाला देवेंद्रजीही उपस्थित आहेत, सर्वपक्ष एकत्र येऊन आपल्या आईचा सन्मान करत आहेत याचा मला आनंद असल्याचे उद्धव ठाकरेंन म्हटले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा ही मराठी आहे. ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे. अशी आपली मराठी भाषा असल्याचे उद्धव यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

मराठी भाषा दिन हा एकच दिवस साजरा करायचा का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. काय होणार मराठीचं हा केविलवाणा प्रश्न आपण विचारू नये, कारण मराठी ही स्वराज्य घडवणारी भाषा आहे. मराठी माणसांच्या दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी, शत्रुची घाबरगुंडी व्हायची, अशी आपली मराठीची ख्याती आहे. आज ही मराठी जगभरात पोहोचली आहे. आपले मराठी बांधव अटकेपार मराठीचा झेंडा रोवत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

मराठी ही शक्तीची अन् भक्तीची भाषा आहे. इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं, तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती. आपली मराठी, मराठीची संस्कृती टिकविण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. मराठी भाषेचा कायदा करण्याचा योगायोग माझ्या काळात आला हे माझं भाग्य की नाईलाज मला माहित नाही. मात्र, माझ्या माईने माझ्याकडून अ.. आ..ई... पाटीवर गिरविलेलं मला आठवलं, जे कुणीही कोणीही कधीही मनातून पुसू शकत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

दरम्यान, विधानभवन परिसरात आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तसेच विधान भवनाच्या आवारात स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रमधील ग्रामीण जीवन दाखवण्यात आले आहे. लोहार, न्हावी कुंभार इत्यादी कसे काम करतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुतूहलाने पाहत आहे. यावेळी, सर्वपक्षीय आमदार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसमवेत दिसून आले.  

टॅग्स :मराठी भाषा दिनउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसविधान भवन