Join us

हवामान खाते म्हणते, ‘मराठी असे अमुची मायबोली’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:54 AM

अ‍ॅपमध्येही प्राधान्य; शेतकरी, विद्यार्थ्यांसह मुंबईकरांना हवामानाची मराठीतून माहिती

- सचिन लुंगसेमुंबई : शेतकऱ्यांना कृषिसंबंधी हवामानाची माहिती मराठी भाषेत देणे, जागतिक हवामान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून अभ्यांगतांना मराठी भाषेतून हवामान खात्याचे कामकाज समजावून सांगणे, हवामान खात्याला भेट देणाºया विद्यार्थी मित्रांना मराठी भाषेतूनच वेधशाळेचे महत्त्व समजावून सांगणे, अशा उपक्रमांंच्या माध्यमातून भारतीय हवामान शास्त्र विभागाने मराठीची पताका अभिमानाने खाद्यांवर फडकावित मराठीतील कामकाजात प्राधान्य दिले आहे.‘मराठी भाषा दिना’निमित्त हवामान खाते कामकाजात मराठीला कितपत प्राधान्य देते, याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी सांगितले, बहुतांश कामकाज हे इंग्रजी, हिंदी भाषांत चालत असले, तरीदेखील आम्ही काम करत असताना स्थानिक भाषा म्हणून मराठीला प्राधान्य देतो. कृषी मोसम सल्लागार युनिट कार्यरत आहे. हे शेतकऱ्यांसाठी काम करते. शेतकºयांनी हवामानाची माहिती मराठीतून दिली जाते. शेतकºयांसह प्रत्येकाला हवामानाची माहिती मराठीतून मिळावी, म्हणून दूरदर्शन, आकाशवाणीची मदत घेतो. कार्यक्रम मराठी भाषेत करून प्रत्येकापर्यंत हवामानाची माहिती देतो. जागतिक हवामान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमांची माहिती मराठीतून प्रसारित केली जाते. विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना वेधशाळेचे महत्त्व मराठीत पटवून दिले जाते. हवामान खात्याचे दैनंदिन वृत्तदेखील मराठी भाषेतच असून, अ‍ॅपमध्येही मराठीला प्राधान्य आहे. 

टॅग्स :मराठी भाषा दिनहवामान