Join us

मराठी हाच श्वास; मराठी हाच ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी भाषा टिकावी, मराठी शाळा बंद होऊ नयेत म्हणून विविध स्तरावर काम केले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी भाषा टिकावी, मराठी शाळा बंद होऊ नयेत म्हणून विविध स्तरावर काम केले जात आहे. आपल्या मातृ भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी आपणही काम केले पाहिजे. मुलांना मराठी शाळेत टाकले पाहिजे, यात काही शंका नाहीच. मात्र, मुलांना मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञानदेखील दिले पाहिजे. कोणत्याच भाषेला कमी लेखता कामा नये. मराठी भाषेतील साहित्य मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काम केले पाहिजे. वेगवेगळे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. भाषांतर शिकविले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाषेचा आपण न्यूनगंड बाळगता कामा नये, असे विविध मुद्दे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मांडण्यात आले.

म. न. पा. शिक्षण विभाग, शिक्षण साधना मंडळाचे

साधना विद्यालय मराठी प्राथमिक येथील मानद सचिव चंद्रकांत खोपड व महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एफ / एन वॅार्डच्या निरीक्षक सुनीता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साधना विद्यालय, सायनतर्फे नुकताच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापिका स्वरूप सावंत यांनी याचे आयोजन केले. प्रशिक्षिका वृषाली बांगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वरूप सावंत लिखित तीन पुस्तकांचे उद्घाटन यावेळी विषयतज्ज्ञ सुवर्णा कंठे यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिक्षकवृंदांनी काव्यवाचन, नाट्यछटा, चारोळी कथाकथन सादर केले. ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांची घोषवाक्ये, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. बांगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.