नामदेव मोरे, नवी मुंबईशहरातील हॉटेलमधील मेनू कार्डमधून मराठी हद्दपार झाली आहे. सर्वच हॉटेल मालकांनी इंग्रजीला पसंती दिल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ग्राहकांनी मागणी करूनही याकडे सर्वच यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये छोटी - मोठी ५०० पेक्षा जास्त हॉटेल व बार आहेत. तेवढीच फास्टफुड व इतर खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आहेत. पूर्वी सर्वच हॉटेलमधील मेनू कार्ड हे मराठी व इंग्रजीमध्ये असायचे. यामुळे नागरिकांना पदार्थ मागविणे सुलभ होत होते. परंतू आता मात्र अपवाद वगळता सर्वच मेनू कार्डमधून मराठी हद्दपार झाली आहे. सर्वत्र इंग्रजीमध्ये मेनूंची नावे दिसू लागली आहेत. यामुळे मराठी व काही प्रमाणात अल्प शिक्षित इतर भाषकांचीही मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. शहरातील नागरिकांचा आर्थिक स्तर वाढत आहे. कुटुंब व मित्रांसोबत हॉटेलमध्ये जाणारांची संख्याही वाढत आहे. परंतू इंग्रजी मेनू कार्डमुळे अनेकांना कोणते खाद्यपदार्थ मागवायचे हेच कळत नाही. मेनू कार्डमधील वस्तूंची नावे वाचता न आल्यामुळे अनेकांना वेटरलाच तुमच्या हॉटेलमध्ये चांगले काय मिळते हे विचारावे लागत आहे. अनेकांना अमुक वस्तू येथे मिळते का याची विचारपूस करावी लागते. खिशात पैसे असतानाही भाषेच्या अडचणीमुळे वस्तू मागविताना दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागल्यामुळे मनामध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. मेनू कार्ड हे ग्राहकांच्या माहितीसाठी असते. ते आकर्षक व चांगल्या दर्जाचे असून उपयोग नाही त्याचा उपयोगही झाला पाहिजे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. इंग्रजी वाचता येत नाही त्यांनी हॉटेलमध्ये जेवण करायचेच नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मेनू कार्डला मराठीचे वावडे
By admin | Published: June 23, 2014 2:37 AM