-संजय घावरेमुंबई - आजवर रंगभूमीवर गाजलेली बरीच नाटके नवा साज लेऊन रुपेरी पडद्यावर अवतरली आहेत. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नसेच‘गारंबीचा बापू’पासून विविधांगी नाटकांचा चित्रपटापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. हिच वाट चोखाळत आणखी दोन नाटके चित्रपट रूपात येण्यासाठी सज्ज झाली आहेत.
सिद्धहस्त लेखक अशी ख्याती असणाऱ्या वि. वा. शिरवाडकर लिखित 'नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर हि व्यक्तिरेखा साकारण्याचा मोह मोठमोठ्या कलावंतांना आवरता आला नाही. सतिश दुभाषींपासून मोहन जोशींपर्यंत अनेक दिग्गजांनी रंगभूमीवर बेलवलकर साकारले. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली मोठ्या पडद्यावर नाना पाटेकरांच्या रूपातील अप्पासाहेबही स्मरणीय ठरले. 'अनन्या', 'सविता दामोदर परांजपे' तसेच 'श्रीमंत दामोदर पंत'सारखी नाटके त्याच शीर्षकाने चित्रपटरूपात आली, पण काही नाटके नाव बदलून सिनेप्रेमींच्या सेवेत रुजू झाली. 'नवा गडी, नवं राज्य' या नाटकावर 'टाईम प्लीज', 'काटकोन त्रिकोण'वर 'आपला मानूस', 'माकडाच्या हाती शॅम्पेन'वर 'बदाम राणी गुलाम चोर', 'लोच्या झाला रे'वर 'खो खो', 'बीपी’ या एकांकिकेवर 'बालक पालक', 'माझं काय चुकलं' नाटकावर 'माझं घर माझा संसार' हे सिनेमे बनले आहेत. 'संगीत कट्यार काळजात घुसली'वरील सुबोध भावेच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या संगीतप्रधान चित्रपटाने विक्रमी लोकप्रियता मिळवली.
मागील काही दिवसांपासून कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित 'संगीत मानापमान'वर 'संगीत मानापमान' हा सिनेमा बनवण्यात सुबोध बिझी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'संगीत मानापमान' या नाटकाला ११३ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत चित्रपटाचे टायटल पोस्टर रिलीज केले होते.
विवेक बेळे लिखित आणि अजित भुरे दिग्दर्शित 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' हे नाटक याच नावाने आदित्य इंगळेच्या दिग्दर्शनाखली मोठ्या पडद्यावर येणार आहे. चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे कलाकार आहेत. वयाच्या चाळीशीतील गंमती जंमती यात आहेत.
नाटकावर सिनेमा बनवण्याबाबत सुबोध म्हणाला की, जे नाटक मनाला भिडते त्यावर सिनेमे बनतात. नाटक हे त्याच्या मर्यादांसकट आणि शक्तीस्थानांसकट लोकांसमोर येते, पण नाटकासारखा सिनेमा होऊ शकत नाही. नाटकाच्या मर्यादेमुळे काही गोष्टी दाखवता येत नाहीत. चित्रपटाचा पसारा मोठा असतो. नाटक सहा सीनमध्ये संपते, पण सिनेमा साधारणपणे ६० सीन्सचा असतो. त्यामुळे माध्यमांतर करताना फरक करावी लागतात. चित्रपटातील कामाची पद्धत वेगळी असतेच, पण व्हिज्युअलाझेशन महत्त्वाचे असते. याचा विचार नाटकावर सिनेमा बनवताना करावा लागतो. नाटकातील जर्म घेऊन सिनेमा बनवला जातो असेही सुबोध म्हणाला.