Join us

राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी सिनेसृष्टीची मोहोर

By संजय घावरे | Published: October 20, 2023 6:48 PM

सर्व विजेत्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्याचा क्षण अनुभवत आनंद व्यक्त केला.

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलावंत-तंत्रज्ञांनी आपला ठसा उमटवला. 'एकदा काय झालं' आणि 'गोदावरी' यांसारख्या आशयघन चित्रपटांच्या जोडीला 'रेखा' आणि जाणीवपूर्वक हिंदीमध्ये तयार करण्यात आलेल्या 'चंद सांसे' या लघुपटाने बाजी मारली. सर्व विजेत्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्याचा क्षण अनुभवत आनंद व्यक्त केला.

- डॉ. सलील कुलकर्णी (एकदा काय झालं - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट)

'वेडींगचा सिनेमा'नंतर संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी 'एकदा काय झालं' हा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारलेला सिनेमा दिग्दर्शित केला. यात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, अर्जुन पूर्णपात्रे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे अशी दमदार स्टारकास्ट आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपात कौतुकाची थाप मिळाल्याने भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी बळ मिळाल्याची सलील यांची भावना आहे. या पुरस्कारामुळे मला आणि पुढच्या पिढीला विश्वास निर्माण होईल की आपण जर मूलभूत चांगल्या व दर्जेदार गोष्टी केल्या तर त्या स्वीकारल्या जातात. सारखं काहीतरी भडक करण्याची गरज नाही. काहीतरी खरंखुरं केलं तरी या पातळीवरचा पुरस्कार मिळू शकतो असेही ते म्हणाले

- निखिल महाजन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - गोदावरी - द होली वॉटर)

जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांचा वर्षाव झालेल्या 'गोदावरी'वर राष्ट्रीय पुरस्काराचीही मोहोर उमटवणे मराठी सिनेमांसाठी अतिशय महत्त्वाचे होते. जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, नीना कुलकर्णी, संजय मोने, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सानिया भंडारे यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात निखिल महाजनने नदी, मानवी स्वभाव आणि बदलणारी जीवनशैली यांची सांगड घातली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर निखिल म्हणाला की, इतका मोठा पुरस्कार मिळालाय यावर विश्वासच बसत नाही. याचं श्रेय संपूर्ण टिमचं आहे. विक्रम गोखलेंपासून सानिया भंडारेंपर्यंत सर्वच जण या पुरस्कारात वाटेकरी आहेत. सुरुवातीपासून 'गोदावरी'ला सगळीकडून प्रेमच मिळालं आहे. मुख्य विभागात दिग्दर्शनासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळणं ही खूप मोठी बाब आहे.

- चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते (चंद सांसे - बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू)

प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'चंद सांसे' या लघुपटानेही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुक्ता बर्वेसह डॉ. मोहन आगाशे यांनी या लघुपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी डेलिब्रेटली 'चंद सांसे' हि शॉर्ट फिल्म हिंदीत केली आहे. अशा लघुपटाची निर्मिती करायला मिळणे आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही खूपच आनंददायी असल्याचे सांगत कुलकर्णी म्हणाले की, आपल्याकडे शॉर्ट फिल्मला फार मोठं व्यासपीठ मिळत नसल्याने हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. शॉर्ट फिल्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. औरंगाबादमधील एमजीएम फिल्म स्कूलच्या मदतीने 'चंद सांसे' ही शॉर्ट फिल्म केली. कोव्हिडच्या अवघड काळात खूप धाडसाने शूटिंग केली. 

- प्रतिमा जोशी, दिग्दर्शिका (चंद सांसे - बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू)

प्रिया तेंडुलकरांची मूळ कथा असलेल्या या लघुपटाने वेगवेगळ्या फेस्टिव्हल्समध्ये पारितोषिके पटकावल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवली आहे. कोव्हिडनंतर काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने हा लघुपट बनवण्यात आला होता. राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपात त्याची पावती मिळाल्याची भावना प्रतिमा जोशी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या. मला आवडलेल्या प्रिया तेंडुलकरच्या गोष्टीवर बनवलेल्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा अधिक आनंद आहे. एमजीएममधील सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शॅार्ट फिल्म बनवली. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही सहभाग यात आहे. मला साहित्यावर कलाकृती बनवायला आवडतात. एखादं नाटक किंवा पूर्ण लांबीचा चित्रपट करताना खूप अपेक्षा असतात, पण शॉर्ट फिल्मकडून फार अपेक्षा नसतात, तेव्हा इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचं वेगळंच महत्त्व असतं. 

- दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे (रेखा - विशेष ज्यूरी अवॉर्ड माहितीपट)

आजवर विविध सामाजिक विषयांवर लघुपट बनवणाऱ्या सांगलीच्या तासगावमधील दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या 'रेखा' या वास्तवदर्शी लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. मूळात तमाशा कलावंत असणाऱ्या माया पवार या तरुणीकडून शेखर यांनी मुख्य भूमिकेत अभिनय करून घेतला. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद शब्दांत व्यक्त करण्याजोगा नसल्याचे सांगत शेखर म्हणाले की, 'रेखा'चे मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गजांनी कौतुक केले. रवी जाधव आणि मेघना जाधव यांनी निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याने तसेच संपूर्ण टिमच्या मेहनतीमुळे स्वप्न सत्यात अवतरले. रवी जाधव यांनी कॉल करून कौतुक केले व 'रेखा'च्या निर्मितीची इच्छा व्यक्त केली. हा चित्रपट स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विविध पैलूंवर प्रकाश टाकताना समाजातील काही मुद्देही अधोरेखित करणारा आहे.

टॅग्स :मराठी चित्रपट