मराठी परिभाषा कोश आता अॅप स्वरूपात, ज्ञानाचा खजिना एका क्लिकवर होणार उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:32 AM2019-02-08T06:32:42+5:302019-02-08T06:33:12+5:30
बऱ्याचदा एखाद्या शब्दाला मराठीत कोणती संज्ञा आहे, हे गुगलवर शोधणे कठीण होते. आपल्याकडे मराठी भाषाविषयक अनेक परिभाषा कोश आहेत, मात्र हे कोश सर्वत्र उपलब्ध होत नाहीत अशी ओरड कायम व्हायची.
मुंबई : बऱ्याचदा एखाद्या शब्दाला मराठीत कोणती संज्ञा आहे, हे गुगलवर शोधणे कठीण होते. आपल्याकडे मराठी भाषाविषयक अनेक परिभाषा कोश आहेत, मात्र हे कोश सर्वत्र उपलब्ध होत नाहीत अशी ओरड कायम व्हायची. त्याचप्रमाणे विश्वकोशही सर्वांना उपलब्ध होत नाही, यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाच्या विश्वात आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने परिभाषा कोश आणि मराठी विश्वकोशाच्या अॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे दोन्ही अॅप्स उपलब्ध असून एका क्लिकवर या माध्यमातून भाषा आणि माहितीचा खजिना उलगडणार आहे.
भाषा संचालनालयाने तब्बल ३५ विषयांवर परिभाषा कोशांची निर्मिती केली आहे. यात अर्थशास्त्र, औषधशास्त्र, कार्यदर्शिका, कार्यालयीन शब्दावली, कृषिशास्त्र, गणितशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, जीवशास्त्र, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र, धातूशास्त्र, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, प्रशासन वाक्यप्रयोग, बैंकिंग शब्दावली (हिंदी), भूशास्त्र, भूगोल, भौतिकशास्त्र, मराठी विश्वकोश परिभाषा कोश, मानसशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, वाणिज्यशास्त्र, विकृतीशास्त्र, वित्तीय शब्दावली, विद्युत अभियांत्रिकी, वैज्ञानिक परिभाषिक संज्ञा, व्यवसाय व्यवस्थापन, शरीर परिभाषा, शासन व्यवहार, शिक्षणशास्त्र, संख्याशास्त्र, साहित्य समीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी यांचा समावेश आहे.
विश्वकोशाचे २० खंड एकत्रित संकेतस्थळावर
विश्वकोश हा मराठी भाषेतील एन्सायक्लोपीडिया असून त्यात ‘अ’ ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख होईल. हा माहितीची खजिना आता अॅप स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे कुठेही, कधीही सहज उपलब्ध होणार आहे. विश्वकोशाचे २० खंड असून यातील नोंदनिहाय, शब्दनिहाय माहिती शोधणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाचे मराठी शब्दकोश, शासनव्यवहार कोश हेसुद्धा एकत्रितरीत्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.