मराठी नाटक समूहाला 'नाम'ची साथ...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 01:51 AM2020-12-07T01:51:04+5:302020-12-07T01:51:54+5:30
Mumbai News : नाट्यसृष्टीतील काही कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांनी एकजूट दाखवत मराठी नाटक समूहाच्या माध्यमातून पडद्यामागील कलावंतांना मदत देण्याचे कार्य सुरू केले. त्यांच्या याच उपक्रमाला 'नाम फाऊंडेशन'ची मोलाची साथ लाभली आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहे बंद झाली आणि रंगभूमीवर अवलंबून असणाऱ्या अनेकांवर उपजीविकेची इतर साधने शोधण्याची वेळ आली. मात्र अशा स्थितीत नाट्यसृष्टीतील काही कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांनी एकजूट दाखवत मराठी नाटक समूहाच्या माध्यमातून पडद्यामागील कलावंतांना मदत देण्याचे कार्य सुरू केले. त्यांच्या याच उपक्रमाला 'नाम फाऊंडेशन'ची मोलाची साथ लाभली आहे.
'एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा'; या ब्रीदवाक्यानुसार मे महिन्यापासून पडद्यामागील कलाकारांकरिता मराठी नाटक समूह मदतनिधीचे वाटप करत आहे. या उपक्रमात आता 'नाम फाऊंडेशन'ने मोठा हातभार लावला आहे. एकूण २०० कलाकारांना प्रत्येकी रुपये २५०० याप्रमाणे 'नाम फाऊंडेशन'ने मराठी नाटक समूहाला मदतनिधी वाटपात सहकार्य केले आहे.
मदतनिधी वाटपाच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्यात पडद्यामागील ३४३ कलाकारांना प्रत्येकी रुपये २५०० आणि अपवादात्मक स्थिती म्हणून एका व्यक्तीला आगाऊ रक्कम रुपये ७५०० अशी मदत मराठी नाटक समूहातर्फे करण्यात आली. याच मदतनिधीत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम फाऊंडेशन'ने एकूण पाच लाख रुपये इतकी रक्कम दिली ओहे. नाटक समूहाने ऑक्टोबर महिन्यात पडद्यामागील ३४३ कलाकारांना मदतीचे वाटप केल्यावर, नोव्हेंबर महिन्यात एकूण ३४५ पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात दिला आहे.