Join us

मराठी नाटक समूहाने उलगडले ‘आठवणीतले शेखर’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

नाटककार शेखर ताम्हाणे यांना शब्दांजलीराज चिंचणकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ नाटककार, नाट्यनिर्माते व उद्योजक शेखर ताम्हाणे ...

नाटककार शेखर ताम्हाणे यांना शब्दांजली

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ नाटककार, नाट्यनिर्माते व उद्योजक शेखर ताम्हाणे यांच्या आठवणी जागविण्यासाठी मराठी नाटक समूहाने ‘आठवणीतले शेखर’ या विशेष कार्यक्रमाचे फेसबुकच्या माध्यमातून आयोजन केले. रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात पुरुषोत्तम बेर्डे, राजन ताम्हाणे, विजय केंकरे, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, संजय मोने, प्रदीप कबरे, संपदा कुळकर्णी, राजीव जोशी, प्रेमानंद गज्वी आदी रंगकर्मींनी शेखर ताम्हाणे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दांजली अर्पण केली.

चौकट :

पुरुषोत्तम बेर्डे -

माझ्या एकांकिका व नाटके यांचे संगीत मीच करायचो. पण एकदा शेखरने एक नवीन नाटक लिहिले आहे, असा राजन ताम्हाणेचा मला फोन आला. मी त्याचे पार्श्वसंगीत करावे अशी त्यांची अपेक्षा होती. मी संहिता वाचली आणि ‘हो’ म्हणालो. ‘सविता दामोदर परांजपे’ हे ते नाटक होते. त्यानंतर शेखर यांचे ‘तू फक्त हो म्हण’ या नाटकाचे पार्श्वसंगीतही मी केले. कमी बोलणे, हा शेखर यांचा स्वभाव होता. ज्यांच्यासोबत काम केले ती व्यक्ती अशी निघून जाते, याचे वाईट वाटते.

संजय मोने - ‘सविता दामोदर परांजपे’ हे पहिलेच असे एक नाटक होते; जे एखाद्या व्यक्तीच्या नावावर होते. शेखर ताम्हाणे यांच्या या पहिल्या नाटकात मला काम करायला मिळाले. एक बुद्धिमान व हुशार माणसाला आपण गमावले आहे आणि ही हानी मोठी आहे.

सविता प्रभुणे - ‘तू फक्त हो म्हण’ हे नाटक ३० वर्षांपूर्वी आले होते. शेखर ताम्हाणे यांच्या या नाटकाचा विषय गुंतागुंतीचा होता आणि माझी यातली भूमिका खूप वेगळी होती. शेखर यांनी थोडक्याच शब्दांत माझ्या भूमिकेची कल्पना दिली. या नाटकातले त्यांनी लिहिलेले शेवटचे स्वगत, एक लेखक म्हणून अतिशय ताकदवान ठरले. ही त्यांच्या लेखणीची कमाल होती. हे नाटक शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे. माझ्या कारकिर्दीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे नाटक ठरले.

राजन ताम्हाणे -

शेखर माझा चुलत भाऊ होता. शाळेत असतानाच त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली होती. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाट्यबीजाचा उगम वसईला झाला. त्याला खरे तर त्या अनुभवावर कादंबरी लिहायची होतो. पण हा कादंबरीचा नाही; तर नाटकाच विषय असल्याचे मी त्याला सुचवले. मग वर्षभर बसून त्याने हे नाटक लिहिले. उद्योजक असणारा शेखर, नाटकाच्या तालमीसाठी चक्क एक महिना रजा टाकायचा. केवळ नाटकच नव्हे; तर पर्यावरण सल्लागार म्हणूनही त्याची कामगिरी मोठी होती. त्यावेळी या क्षेत्रात सल्लागार म्हणून केंद्र शासनासाठी काम करणारे देशात केवळ तिघेच होते आणि त्यात शेखर होता.

विजय केंकरे -

शेखर ताम्हाणे यांच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने मनात घर केले. विनोदी नाटके जोरात सुरू असण्याच्या त्या काळात या वेगळ्या विषयावरच्या नाटकाने सर्वांना खिळवून ठेवले. या नाटकाची संरचना भक्कम होती. मोजके आणि नेमके लेखन केल्याने शेखर ताम्हाणे महत्त्वाचे नाटककार ठरले. त्यांनी नाटकांची निर्मिती केली; तेव्हा नवीन मंडळींवर विश्वास टाकला. समोरच्याला समजून घेणारा तो माणूस होता. चुकीच्या वेळी त्यांनी एक्झिट घेतली आहे.

प्रशांत दामले -

मी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केल्यापासून शेखर ताम्हाणे यांचे नाव ऐकत होतो. कोरोनाच्या काळात मराठी नाटक समूहाने पडद्यामागच्या कलाकारांना केलेल्या मदतीत शेखर ताम्हाणे यांनी मोठा पुढाकार घेतला. जितके कमी बोलाल, तितके उत्तम काम कराल, अशी त्यांची वृत्ती होती. माझे नाटक संपल्यावर भेटून, एक त्रयस्थ या नात्याने ते उत्तम विश्लेषण करायचे. त्यांचे मला खूप मार्गदर्शन लाभले. बुद्धिवान लेखक व माणूस म्हणून शेखर ताम्हाणे कायम स्मरणात राहतील.

संपदा कुळकर्णी -

शेखर ताम्हाणे यांचे ‘तिन्हीसांज’ हे नाटक मी दिग्दर्शित केले. राजन ताम्हाणे यांच्यासारखा दिग्दर्शक जवळ असताना त्यांनी मला हे नाटक दिले. उद्योजक असून केवळ नाट्यवेडामुळे ते सतत नाटक करत राहिले. कुठलीही आर्थिक अडचण न निर्माण होता मी केलेले हे पहिलेच वेगळे प्रोजेक्ट ठरले. मी सुचविल्याप्रमाणे संहितेत बरेच बदल त्यांनी केले, हे विशेष. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्मळता होती. ते कुठल्याही विशिष्ट गटातटातले नव्हते.

प्रेमानंद गज्वी -

शेखर ताम्हाणे हे कमी बोलायचे; पण त्यांचे निरीक्षण अफाट होते. त्याचा उपयोग त्यांनी नाटकांत केला. जिथे जिथे गरज होती; तिथे त्यांनी हात पुढे केला. या लेखकाकडे दानत होती. ते आणखी नाटके नक्कीच देऊ शकले असते.

राजीव जोशी -

शेखर ताम्हाणे यांच्या एकांकिकांचे विषय मनाची पकड घ्यायचे. त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या एकांकिका आजही स्मरणात आहेत; ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. आम्ही समकालीन होतो. त्यांच्या नाटकांतून ते अधिक भेटत गेले. केवळ स्वतःचीच नाही; तर इतरांच्या नाटकांचीही त्यांनी निर्मिती केली.

प्रदीप कबरे -

अतिशय मोठे हृदय असणारी ही व्यक्ती होती. ‘मराठी रंगकर्मी दिवस’ असो किंवा नाट्यस्पर्धा असोत; शेखर ताम्हाणे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------