मुंबई - महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे १५ कोटी आहे. एखाद्या युरोप देशापेक्षाही जास्त संख्या महाराष्ट्राची आहे. इतके असूनही काही ठराविक नाटके-चित्रपट वगळले तर हे पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग का येत नाही? याचा विचार व्हायला हवा. यासाठी आपण सगळ्याच दृष्टिकोनातून कात टाकणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे म्हणाले. तिकिटालय या अॅपच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह हक्काचे तिकीट बुकिंग अॅप देण्याच्या हेतूने प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत 'तिकिटालाय' हे अॅप लाँच केले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये या अॅपचे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे, तर ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्याला मराठी नाट्य-सिने क्षेत्रातील कलाकार-तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. उद्घाटनानंतर अशोक सराफ म्हणाले की, प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने तिकिटालय या अॅपच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांनी मराठी नाटके पाहायला हवीत. त्यासाठी हे अॅप फायदेशीर ठरेल असेही सराफ म्हणाले. महेश कोठारे म्हणाले की, प्रशांतने एक वंडरफुल गोष्ट मराठीला दिली आहे. गरज आहे ती शोधा आणि पूर्ण करा हा कोणत्याही व्यवसायाचा पहिला कानमंत्र असतो. प्रशांतने मराठीची गरज ओळखून हे अॅप बनवले आहे. यासाठी प्रशांत आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो. या अॅपचे नावही छान असल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, मनोरंजन वाहिन्यांवर जे बघायला मिळते ते प्रेक्षक तिकिट काढून बाहेर बघायला जाणार नाहीत. या व्यतिरिक्त काही मिळणार असेल तर प्रेक्षक नक्कीच येतील. हिंदीतही दणादण चित्रपट आपटत आहेत. कारण लोकांना तोचतोचपणा नको आहे. त्यामुळे मराठीने कात टाकण्याची गरज आहे. नवीन संकल्पना येणे गरजेचे आहे. माझ्याकडून जे काही अपेक्षित आहे त्यासाठी मी निश्चित आपल्या मागे उभा असल्याचे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.
प्रशांत दामले यांनी तिकिटालय या अॅपची माहिती दिली. ते म्हणाले की, कोव्हिडनंतर बुकींगच्या प्लॅटफॅार्म्सवर विविध भाषा आल्या आहेत. त्यामुळे मराठी कार्यक्रम मागे पडले असून, ते शोधावे लागतात. यावर काहीतरी करायला हवे हा विचार पाच-सहा महिन्यांपासून डोक्यात घोळत होता. त्यातून हे अॅप तयार झाले आहे. यात मराठी चित्रपट, नाटक, कार्यक्रमांची सर्व माहिती आहे. नाटकाबाबतची संपूर्ण माहिती या अॅपमध्ये राहणार आहे. या अॅपमुळे मराठी नाटकांचे दौरे वाढू शकतील आणि प्रयोगांची संख्या वाढू शकेल.
चंकूसर असं काही नसतं...
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर राज ठाकरे म्हणाले होते की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. सूत्रसंचालन करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेच्या मुखातून चंद्रकांत कुलकर्णी यांचा उल्लेख चंकूसर असा केला गेला. त्यावर राज ठाकरे यांनी 'चंकूसर असं काही नसतं...' असे म्हणत संकर्षणला कानपिचक्या दिल्या. यालाच जोडून त्यांनी 'अंड्या' बोलायचे नसल्याने श्रीरंग गोडबोलेंनी कॅफे गुडलकमध्ये जाऊन दोन आनंदरावांची आम्लेट मागितल्याचा किस्साही सांगितला.