Join us

मराठी नाटकांना परदेशवारी ठरतेय भारी; रसिकांचा तूफान प्रतिसाद रंगकर्मींना देतो बळ

By संजय घावरे | Published: May 22, 2024 9:24 PM

फायदेशीर ठरताहेत मराठी नाट्यप्रयोग

मुंबई- मागील काही महिन्यांमध्ये बऱ्याच मराठी नाटकांनी परदेश दौरा करत साता समुद्रापार असलेल्या मराठी बांधवांचे मनोरंजन केले आहे. मागील दोन महिन्यांपामधील महाराष्ट्रातील वातावरण आणि कमालीचा उन्हाळा पाहता परदेशातील मराठी नाट्यप्रयोग फायद्याचे ठरत आहेत.

'चारचौघी', '३८ कृष्ण व्हिला', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'नियम व अटी लागू', 'कुर्रर्रर्र', 'खरं खरं सांग', 'अश्रूंची झाली फुले', 'परफेक्ट मर्डर' अशा जवळपास नऊ-दहा नाटकांनी मागील काही महिन्यांमध्ये परदेशवारी केली आहे. ऑक्टोबरपासून 'काळी राणी', 'श्रीमंत दामोदरपंत', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'पुनश्च हनीमून'सह आणखी दोन-चार नाटके परदेशवारीवर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिगीषाची निर्मिती असलेल्या 'चारचौघी'ची टिम नुकतीच ३५ दिवसांचा अमेरिकेचा दौरा करून भारतात परतली आहे. ३५ दिवसांच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक शनिवार-रविवारी 'चारचौघी'चे १३ प्रयोग सादर करण्यात आले. शेवटच्या वीकेंडला शुक्रवार, शनिवार, रविवार तीन दिवस प्रयोग झाले. या नाटकाने १२ शहरांमधील रसिकांचे मनोरंजन केले. यासाठी जिगीषातर्फे चार सेटससाठी लागणारे फ्लेक्स पाठवले होते. पहिला प्रयोग झाल्यावर तो सेट पाचव्या प्रयोगासाठी फिरवण्यात आला होता. 

परदेश दौऱ्यासाठी साधारणपणे कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांसोबतच सेटिंग, साऊंड, संगीत, प्रकाश योजनाकार अशी तंत्रज्ञांची टिम नेली जाते. शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या फाईव्ह डायमेन्शनसारख्या कंपन्या प्रयोग आयोजित करतात. नाट्यगृह बुकिंगपासून तिकिट विक्रीपासून कलेक्शनपर्यंत सर्व कामे पाहात नफा-तोट्याचे गणित आयोजकच सांभाळतात. कलाकारांचे मानधन अगोदरच ठरवून निर्मात्यांना एक फिक्स रक्कम दिली जाते. निर्माते महाराष्ट्रात एका नाट्यप्रयोगासाठी येणाऱ्या एकूण खर्चापेक्षा वाढीव रक्कम ठरवतात. त्यामुळे निर्मात्यांना तोटा होण्याचा धोका नसतो. महाराष्ट्रात मात्र प्रयोगाचा खर्च आणि बुकिंगचे गणित निर्मात्यांना जुळवावे लागते. त्यातून कित्येकदा तोटाही सहन करावा लागतो. परदेशात नाटकाच्या संपूर्ण टिमच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था आयोजकांकडून केली जाते. शेवटी निर्माते कशा प्रकारचे डिल करतात त्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. ........................- श्रीपाद पद्माकर (नाट्य निर्माते, जिगिषा)'चारचौघी' पाहण्यासाठी न्यूजर्सीला १००० प्रेक्षक होते. सॅन होजेला दोन आठवडे अगोदर नाटक हाऊसफुल होते. त्यांनी तिसऱ्या प्रयोगाचीही डिमांड केली होती, पण प्रॅक्टिकली शक्य नसल्याने करता आला नाही. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर एका छोट्या सेक्टरला शुक्रवारी अॅडीशनल प्रयोग केला. तिथे १००-१२५ प्रेक्षक येणार होते, पण जवळपास पावणे तीनशे तिकिटे विकली गेली. त्यामुळे आम्ही सेट लावून प्रयोग केला. रसिकांचा तूफान प्रतिसाद मिळाल्याने आम्हालाही बळ मिळते............................४० ते १०० डॉलर्सचे तिकिटआपल्याकडे २०० रुपये ते ५०० रुपये असा तिकिट दर आहे. अमेरिकेमध्ये ४० डॉलर्सपासून १०० डॅालर्सपर्यंतचे तिकिट असते. सरासरी ८० ते ५० डॉलर्समध्ये नाट्य प्रयोग लावण्यात येतात. ...........................स्प्रिंग सीझन महत्त्वाचा...साधारणपणे सप्टेंबर ते मे या काळात अमेरिकेमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग होतात. स्प्रिंग सीझन म्हणजेच एप्रिल-मे महिन्याचा काळ अमेरिकेत नाटकांसाठी चांगला मानला जातो. त्यानंतर तिथे सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो. ..............................परदेशासाठी सेटचे दोन प्रकार...परदेश दौऱ्यासाठी सेट दोन प्रकारे नेला जातो. विमानाने फोल्डिंग सेट न्यायचा किंवा तिथल्या आयोजकांनी तयार केलेल्या पॅनल्ससाठी फ्लॅक्स घेऊन जायचे आणि तिथे सेट उभा करायचा. .......................तिथे सेट उभारायचा असल्यास...परदेशात सेट उभारायचा असल्यास रंगमंचाच्या दृष्टिकोनातून अगोदरच डिझाईन बनवले जाते. सोफा, झोपाळा, बेडसारखे फर्निचर व इतर गोष्टी आयोजकांकडून मिळतात, पण साईज आणि फोटोग्राफ्स अगोदरच पाठवले जातात. ......................सेट नेणे खर्चिक ठरते...इथून फोल्डिंग सेट न्यायचा असल्यास अगोदर तो बनवण्यासाठी खर्च करावा लागतो. तो वजनाने हलका असावा लागतो. विमान कंपनीच्या दरानुसार सेट नेण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे आता हि पद्धत कमी झाली आहे.

टॅग्स :मुंबई