मुंबई - देवा चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपटाला समर्थन देत प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे असं ठणकावून सांगितलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे अशी खंतही बोलून दाखवली. येत्या शुक्रवारी सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' सोबत अंकुश चौधरीचा 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. पण 'देवा' आणि 'गच्ची' या दोन्ही चित्रपटांना सिनेमागृह मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
देवा सिनेमाला थिएटरर्स मिळत नसल्याने निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत आमच्या “खास” भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल असा इशारा दिला होता. मुंबई आणि उपनगरांतील 22 तारखेचे सुमारे 98 टक्क्यांहून अधिक शो सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘टायगर जिंदा हैं’च्या नावावर आहेत.
मनसेनंतर नितेश राणे यांनीही सिनेमाला समर्थन दाखविलं. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थिएटर्सना कुठलाच टायगर वाचवू शकणार नाही!! महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
खिलाडी अक्षय कुमारनेही ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं होतं. बॉलिवूड विरुद्ध मराठी असे दोन गट पडले असताना खिलाडी अक्षय कुमारने लोकांना 'देवा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. अक्षय कुमार आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. मात्र अक्षयने ट्विट करत अंकुश चौधरीचा 'देवा' हा मराठी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार मराठीत बोलला आहे. यावेळी त्याने प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे.
अक्षय व्हिडीओत सांगत आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी.. प्रमोद फिल्म्स आणि देवा सिनेमाच्या पूर्ण टीमला माझ्या खूपखूप शुभेच्छा. पाहायला विसरु नका, देवा - एक अतरंगी.. तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र'.