Join us

ॲब्सर्ड थिएटरची पायाभरणी करणारा मराठी वैश्विक ग्रंथ -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:06 AM

मुंबईसामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या ॲब्सर्डिटी, ॲब्सर्डिझम व ॲब्सर्ड या तत्त्वांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हायला हवा. भारतीय विचार पद्धतीला नवीन ...

मुंबई

सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या ॲब्सर्डिटी, ॲब्सर्डिझम व ॲब्सर्ड या तत्त्वांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हायला हवा. भारतीय विचार पद्धतीला नवीन संधी देऊन ॲब्सर्ड थिएटरची पायाभरणी करणारा हा मराठी वैश्विक ग्रंथ आहे. हा ग्रंथ मराठीतील ॲब्सर्ड रंगभूमीचा इतिहास मांडत असला, तरी त्याला तत्त्वचिंतनाची व द्रष्टेपणाची अनोखी झालर लाभलेली आहे, असे भाष्य ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार संजय सोनवणी यांनी केले.

डॉ. सतीश पावडे लिखित 'मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर' या ग्रंथाच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून भारतीय साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान - 'शब्दसृष्टी'द्वारे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.

कोलंबो येथील 'डे ड्रीम थिएटर्स'च्या संचालिका तिलिनी दर्शनी मुनसिंह लिव्हेरा, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अभिनेत्री व लेखिका डॉ. निशिगंधा वाड, नाटककार व लेखक राजीव जोशी, चित्रकार व लेखक विजयराज बोधनकर, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप साळुंके, बहुजन रंगभूमी नागपूरचे अध्यक्ष नाटककार व दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर, आदिवासी कला व साहित्याच्या अभ्यासिका डॉ. मंदा नांदुरकर, ग्रंथाचे लेखक डॉ. सतीश पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुक्त आशयातून जन्म घेणारा ॲब्सर्ड हा कलाप्रकार आहे. मानवी विचार प्रसारणाच्या मुळाशी असलेल्या सामाजिक, मानसिक प्रक्रियेच्या गुंतागुती प्रकट करण्याचे सामर्थ्य या कलाप्रकारात अधिक आहे. संवेदनशील, सृजनक्षम व मर्मज्ञ ज्ञानेंद्रियातून आविष्कृत झालेला डॉ. सतीश पावडे यांचा हा ग्रंथ मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारा आहे, असे मत विजयराज बोधनकर यांनी यावेळी व्यक्त केले.

भारतीय रंगभूमीच्या दालनातील महत्त्वपूर्ण दालन असलेल्या मराठी रंगभूमीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पाश्चिमात्य साहित्यातील नावीन्यता मराठी रंगभूमीने आत्मसात केली आहे. प्रायोगिक रंगभूमीवर नवनवीन कलात्मक जाणिवा आविष्कृत होत असताना, विसंगतीतून सुसंगतीचा शोध घेणारा 'मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर' हा वैश्विक रंगभूमीचा मराठी वारसा सांगणारा ग्रंथ आहे, असे गौरवोद्गार डॉ. निशिगंधा वाड यांनी याप्रसंगी काढले.