मराठी-गुजराती ‘लक्ष्य’
By admin | Published: February 11, 2017 04:35 AM2017-02-11T04:35:32+5:302017-02-11T04:35:32+5:30
डी’ वॉर्डमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवार मराठी-गुजराती मतदारांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यातील युती-आघाडीचे गणित बिघडल्यापासून सर्वपक्षीय
मुंबई : ‘डी’ वॉर्डमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवार मराठी-गुजराती मतदारांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यातील युती-आघाडीचे गणित बिघडल्यापासून सर्वपक्षीय उमेदवारांचा कंबर कसून प्रचार सुरू आहे. ‘डी’ वॉर्ड हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर असल्याने येथील मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांची चढाओढ सुरू आहे.
डी वॉर्डमध्ये गुजराती मतदारांची संख्या १ लाख ३ हजार ५४८ एवढी आहे, तर १ लाख ७२७ इतके मराठी मतदार आहेत. त्यामुळे येथील सहा प्रभागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची भिस्त याच मतदारांवर आहे. तसेच प्रचारासाठी उमेदवारांच्या घरोघरी गाठीभेटी सुरू आहेत. त्याचबरोबर प्रचारफेऱ्या, रॅली, मराठी आणि गुजराती भाषेतील व्हॉट्सअॅप मेसेज आणि पोस्टर्स यावर भर दिला आहे. याशिवाय, सोशल मीडियावरही वेगवेगळ्या मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेतून मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर उमेदवार जोर देत आहेत. तर या विभागात प्रचाराकरिता गुजराती समाजातील महिलांनाही विशेष टार्गेट करण्यासाठी गुजरातीतून संवाद साधण्यावर भर दिला जातो आहे.
पालिकेच्या ‘डी’ विभागात २१४ ते २१९ असे एकूण सहा प्रभाग असून यात एकूण १२ लाख १ हजार १७१ मतदार आहेत. या वॉर्डमध्ये ग्रँट रोड, ताडदेव, गावदेवी, खेतवाडी १२ वी गल्ली, कुंभारवाडा, गवालिया टँक, तुळशीवाडी, फणसवाडी अशा वेगवेगळ्या परिसरात मिळून एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यात २१४ या प्रभागात पाच अपक्षांसह ४ प्रमुख पक्षांचे दावेदार आहेत, तर २१५ मध्ये एका अपक्षासह ५ पक्षांचे उमेदवार आहेत. २१६ मध्ये ६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रामुख्याने येथील २१७, २१८ आणि २१९ या प्रभागांमध्ये निवडणुकीच्या लढतीत केवळ शिवसेना, मनसे, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे उमेदवार असल्याने मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी खास वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहेत. (प्रतिनिधी)