शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:23 AM2019-09-30T06:23:07+5:302019-09-30T12:51:56+5:30

आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले.

Marathi impression on Mumbai politics is being wiped out | शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'!

शिवसेना-मनसेला '१७' चा खतरा; भाजपासाठी ठरणार 'लकी नंबर'!

Next

- मिलिंद बेल्हे

आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या ४५ लाख होती. ती दहा वर्षांत घसरून ४४ लाखांवर आली. गेल्या नऊ वर्षांत ती आणखी घसरल्याचा अंदाज आहे. त्यातच सर्वाधिक गुजराती भाषक असलेल्या देशातील पहिल्या पाच शहरांत मुंबई असल्याचे वास्तव यावेळी उघड झाले. बडोद्यानंतर राजकोटपाठोपाठ मुंबईत गुजराती भाषक असल्याचेही जनगणनेतून पुढे आले. गेल्या नऊ वर्षांत राजकोटला मागे टाकून मुंबई आणखी वर सरकली. मुंबईतील गुजराती भाषकांची संख्या २४ लाखांच्या घरात आहे. म्हणजे येथील १७ टक्के मतदार गुजराती आहे.

मुंबईत सतत होणारी बांधकामे, वेगवेगळे प्रकल्प, टोलेजंग टॉवर यामुळे लोकसांख्यिकी शास्त्र (डेमोग्राफी) बदलत गेली. त्यातूनच मराठी भाषक अडीच टक्क्यांनी घटले. २००० सालानंतरच्या पहिल्या दशकात मुंबईत दररोज किमान अडीच लाख स्थलांतरित येत होते, अशी आकडेवारी तेव्हा राज्य सरकारनेच जाहीर केली होती. त्यातून २०११ च्या जनगणनेत मुंबई, ठाणे जिल्हा पालघर आणि रायगडचा मुंबई महानगर प्रदेशाचा भाग (एमएमआर) यात हिंदी भाषकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली. २००१ च्या जनगणनेत मुंबईत २६ लाख असलेले हिंदी भाषक दहा वर्षांत म्हणजे २०११ पर्यंत ३६ लाखांवर गेले आणि ठाणे, नवी मुंबई, तिला लागून असलेला रायगडचा भाग, तसेच मीरा-भाईंदर, वसई-विरारच्या पट्ट्यात हिंदी भाषकांची संख्या ८० टक्के वाढली. वेगवेगळ्या स्थलांतरितांमधील ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषकांची संख्या ८०.४५ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ती ८७ टक्के आहे. याच काळात उर्दू भाषकांची संख्या आणि मुंबईवरील प्रभावही घटला. २००१ मध्ये १७ लाखांच्या घरात असलेले उर्दू भाषक दहा वर्षा$ंतच अडीच लाखांनी घटून साडेचौदा लाखांवर आले. या संपूर्ण भागात विधानसभेचे ६७ मतदारसंघ आहेत, हे लक्षात घेतले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील या टक्केवारीचे महत्व लक्षात यावे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या काळात मुंबईच्या अर्थकारणावरील दाक्षिणात्यांचा प्रभाव मराठीच्या आंदोलने मोडून काढला गेला. पण स्वस्तातील मजूर म्हणून उत्तर प्रदेश, बिहारमधून स्थलांतर वाढले. मुंबईत गिरण्या सुरू असतानाच्या काळात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून स्थलांतराचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या दोन दशकांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातूनही स्थलांतर वाढले. या साºया सरमिसळीमुळे मुंबई महानगर प्रदेशात जरी मराठीचा टक्का टिकून असला, तरी हिंदी आणि गुजराती भाषकांचा प्रभाव प्रचंड वाढला. तो राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरला. त्यामुळे नाशिकच्या सभेत मोदींनी गुजरात हा लहान भाऊ असल्याचे सांगितले असले, तरी हा लहान भाऊच मुंबई महानगराच्या राजकारणात थोरला झाला आहे. याचा परिणाम म्हणून सर्वच पक्षांची फक्त मराठीची हाक मवाळ होत गेली. फक्त मराठीचा गजर करणाºया उमेदवाराला; मग तो शिवसेनेचा असो, की मनसेचा त्याला गुजराती मते सहजासहजी मिळत नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही त्या समाजाला आपलेसे करता आलेले नाही. त्यावर सर्वाधिक प्रभाव आहे, तो भाजपचा. त्यापाठोपाठ हिंदी भाषक येथील राजकारणावर आणि अर्थकारणावर प्रभाव टाकतात. त्यामुळे ‘एक देश एक भाषे’वरून दक्षिणेतून जेववढी तीव्र प्रतिक्रिया आली, तेवढी मुंबईने दिली नाही, याचे हेही एक कारण असावे.

Web Title: Marathi impression on Mumbai politics is being wiped out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.