Join us

"मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा"; चित्रा वाघ यांचा निशाणा कुणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 3:18 PM

पंकजा मुंडे यांनीही त्यांना मुंबईत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला होता.

मुंबई - मुलुंड येथे मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याची घटना घडली. त्यानंतर, मुंबईतील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतली. त्यातच, मनसैनिकांनी पीडित महिलेचे समर्थन करत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रांना माफी मागायला भाग पाडले. याप्रकरणी, पीडित महिला तृप्ती यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे, मुंबईतील मराठी हा मुद्दा पुन्हा राजकीय नेत्यांनी हाती घेतल्याचं दिसून येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून थेट इशाराच दिला आहे. आता, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही पीडित तृप्ती देवरुखकर या महिलेची भेट घेत घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवला.  

मुलुंडमधील घटनेनंतर पंकजा मुंडे यांनीही त्यांना मुंबईत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला होता. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.  तर, सत्ताधारीही भूमिका मांडताना विरोधकांना लक्ष्य करत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही भूमिका स्पष्ट केली. मात्र, यावेळी नाव न घेता त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता, हे पाहता येईल. 

गेली २५ वर्षे मराठी माणूस आणि मराठी माणसांच्या जीवावर राज्य करणाऱ्या बेगडी लोकांचं बेगडेपण समोर येतंय का?. कारण, गिरगाव, दादर, परळ आणि लालबाग येथून मराठी माणूस का आक्रसत गेला, हे विचार करण्याची गरज आहे. म्हणजे, मराठी आमचा धंदा आणि निवडून द्या यंदा...अशाच पद्धतीची निर्लज्ज भूमिका मराठी मराठी म्हणवणाऱ्यांनी घेतलीय, असा खोचक टोला भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला. चित्रा वाघ यांचा रोख अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर होता, असेच त्यांच्या बोलवण्यावरुन दिसून येते. मुंबईत तृप्ती यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

आम्ही मराठी वाढवू आणि मराठी संस्कृतीही वाढवू. जसं भारतात भारतीयता तसं महाराष्ट्रात मराठीयता टिकलं पाहिजे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे, असेही वाघ यांनी म्हटलं. सरकारची भूमिका येणाऱ्या दिवसांत स्पष्टपणे नमून केली जाईल. जे घडलं त्याचं समर्थन नाहीत. पण, आमचे लोकप्रतिनिधी हे मराठी, गुजराती ह्या सगळ्यांसाठीच काम करतात. सगळ्यांचीच मतं त्यांना पडतात. म्हणून सर्वधर्म समभाव घेऊन चालणारी भारतीय जनता पार्टी आहे. एखाद्या घडलेल्या घटनेवरुन सगळेच त्या मानसिकतेचे असतील, असं म्हणणंही चुकीचं असल्याचं वाघ यांनी स्पष्ट केलं.  

पंकजा मुंडेंनी सांगितला अनुभव

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आत्तच्या राजकारणाचे वातावरण पाहता मनस्थिती खराब आहे. लोकांकडे साधने आहेत, परंतु अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, निळा असे लोकं वाटले गेलेत. एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली. खरेतर भाषा आणि प्रांतवादाच्या राजकारणात मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय प्रवासात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतवाद यावर टिप्पणी केली नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणत्या भाषेत पाटी लावावी यावर मी बोलली नाही. परंतु एक मुलगी रडून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगते हा प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. 

माझे सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचे होते तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला आहे. मराठी लोकांना घर देत नाही असं ऐकलं आहे. मी कोणत्या एका भाषेबद्दल बोलत नाही. मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, धर्माने नटलेले आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं प्रत्येकजण येतोय, परंतु आम्ही मराठी लोकांना घर देत नाही हे जर कोण बोलत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आला आहे, असे पंकजा यांनी सांगितले. 

 

टॅग्स :चित्रा वाघभाजपामुंबईमराठीशिवसेना