लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक विभूतींनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. मराठी साहित्याची परंपरा केवळ अतिप्राचीन नाही तर बहुआयामी आहे. संस्कृती, परंपरा, साहित्य, इतिहास यांचा आणि भाषेचा संबंध असतो. मराठी भाषेने स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना जागृत केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
मुंबईतील बीकेसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी अभिनंदन सोहळा शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्यासह साहित्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, की महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि सर्व जगातील मराठी भाषक मंडळींचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषिकांसाठी आणि मराठीच्या इतिहासामध्ये हा महत्त्वाचा दिवस आहे. मराठी बोलणारे, जाणणारे यांना अनेक वर्षांपासून जी प्रतीक्षा होती, स्वप्न होते ते पूर्ण करण्याचे सौभाग्य मला मिळाले.
मराठीचा इतिहास समृद्ध
मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे. याच भाषेतून संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानाची शक्ती दिली. त्यातून अनेक पिढ्यांचे मार्गदर्शन मिळाले आणि आजही मिळत आहे. संत नामदेव यांनी भक्तिमार्गाची चेतना जागृत केली. संत तुकाराम यांनी धार्मिक जागरूकतेचे अभियान चालवले. संत चोखामेळा यांनी सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन सशक्त केले, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात मराठी भाषेला हा दर्जा मिळाला. हा त्यांना केलेला मानाचा मुजराच आहे. महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारी नेत्यांच्या विचारांनी देशाला एकजूट केले, प्रेरित केले. गणपतीची पूजा करतो तेव्हा येणारे ‘गणपती बाप्पा मोरया’ हे शब्द नाहीत तर अनंत भाषेचा प्रवाह आहे. विठ्ठल अभंग ऐकणारे मराठी भाषेसोबत जोडले जातात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.