लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ सुशान्त देवळेकर यांना जाहीर झाला आहे. तर, जयवंत चुनेकर ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी ग्राममंगलच्या प्रयोगशील शिक्षिका सुषमा पाध्ये यांची निवड झाली आहे. मराठी भाषेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वार्तांकन करणाऱ्या दीपाली जगताप यांना दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी अभ्यास केंद्रातर्फे हे भाषा पुरस्कार दिले जातात. विविध कृतिगटांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणारी मराठी अभ्यास केंद्र ही स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेमार्फत मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना प्रोत्साहन म्हणून न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार, अभ्यास केंद्राचे हितचिंतक व भाषाभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दोन पुरस्कार देण्यात येतात. भाषा पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून, यंदापासून दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार या आणखी एका पुरस्काराची घोषणा केंद्राने केली आहे.
दरवर्षी हे भाषा पुरस्कार मराठी भाषा दिनाला समारंभपूर्वक प्रदान केले जातात. परंतु, यंदा कोविडमुळे त्यांचे वितरण पुढे ढकलावे लागत आहे. परिस्थिती सामान्य होताच ते संबंधितांना दिले जातील, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी दिली.