लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजूषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनासोबतच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जाईल.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणा-या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गुरुवारी मंत्रालयात दीपप्रज्वलनाने पंधरवड्याला सुरुवात होईल. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शासकीय मुद्रणालयासह विविध विभागांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे बेस्टच्या ‘नीलांबरी’ बसमध्ये फिरते प्रदर्शन असेल. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाॅइंट या भागात असेल. या प्रदर्शनातून सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील. तसेच मंत्रालयात अभिवाचन स्पर्धा भरविली जाणार आहे. याशिवाय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथितयश लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन तसेच मराठी भाषेतील पीडीएफ व डिजिटाइझ स्वरूपातील ग्रंथ संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पंधरवड्याच्या समारोपाच्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी ‘साहित्ययात्री’ या प्रश्नमंजूषेचे आयोजन केले जाणार आहे. मंत्रालयात होणाऱ्या या कार्यक्रमात अभिवाचन आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना सुभाष देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
............................