स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस होणार साजरा
By मनोहर कुंभेजकर | Published: February 25, 2023 04:31 PM2023-02-25T16:31:41+5:302023-02-25T16:31:49+5:30
दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक व कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस
मुंबई-
दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक व कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवसानिमित्त सोमवार दि. २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई रुग्णालय शेजारी, न्यू मरीन लाईन्स येथे सायंकाळी ६-०० ते रात्रौ ९- ०० या कालावधीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आणि माजी मंत्री
आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा दिवस निमित्त जागर अभिजात मराठी भाषेचा या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत मुक्ताबाई यांच्यापासून आज पर्यन्तच्या सुप्रसिध्द कविवर्य आणि गीतकार यांच्या वेचक कविता व गीत रचानांवर आधारित सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीत संयोजक व संगीतकार पं. आप्पा वढावकर यांचे संगीत संयोजन लाभले असून सुप्रसिध्द व्हायोलीन वादक श्रुती भावे यांच्यासह प्रसिद्ध वादक कलाकार आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री - लेखिका सुप्रिया मतकरी या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज लिखित, विनोद वीज म्हणाली धरतीला या नाटकातील प्रसंगाचे अभिवाचन करतील त्यांच्या सोबत ज्ञानराज पाटकर असतील.ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते व डॉ. अपर्णा प्रभू हे नटसम्राट नाटकातील प्रसंग सादर करणार आहेत अशी माहिती स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे
प्रदीप मयेकर यांनी दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित ज्येष्ठ दिग्दर्शक शिवदास घोडके दिग्दर्शित मुंबई कुणाची ? या नाटकातील सद्य राज्य स्थितीवर कोरडे ओढणारा नाट्य प्रवेश प्रसिद्ध इप्टा संस्थेतील नवे तरुण कलाकार सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन अजितेम जोशी यांची असून निर्मिती शुभा जोशी आणि कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रशांत जोशी यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध रेडिओ जॉकी मंदार खराडे व शिबानी जोशी करणार आहेत.