स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने साजरा होणार मराठी भाषा दिवस; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
By मनोहर कुंभेजकर | Published: February 18, 2023 05:40 PM2023-02-18T17:40:49+5:302023-02-18T17:41:04+5:30
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुंबई-दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवसानिमित्त रविवार दि. २७ फेब्रुवारी, रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई रुग्णालय शेजारी, न्यू मरीन लाईन्स येथे सायंकाळी ६-०० ते रात्रौ ९- ०० या कालावधीत संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष, आमदार विलास पोतनीस, महासंघ कार्याध्यक्ष आमदार सुनिल शिंदे आणि महासंघ सरचिटणीस प्रदिप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी आणि संलग्न समित्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
मराठी भाषा दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता शिवसेनाभवनात आयोजित केलेल्या लोकाधिकार समिती महासंघ पदाधिकारी व संलग्न समिती पदाधिकारी यांच्या बैठकीत खासदार अनिल देसाई यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कार्यक्रमाच्या नियोजना संबंधात विविध सूचना दिल्या. सदर मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणून समितीच्या चळवळीच्या इतिहासात कार्यक्रमाची नोंद होईल असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यानी करावा तसेच या कार्यक्रमात लोकाधिकार समित्यातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत महासंघाचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते स्वर्गीय सुधीरभाऊ जोशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.