राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:57 AM2019-12-04T04:57:00+5:302019-12-04T05:00:12+5:30
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मंगळवारी शासन निर्णय जाहीर केला.
मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना या कालावधीत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मंगळवारी शासन निर्णय जाहीर केला.
या काळात मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील तज्ज्ञ, लेखक, वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन तसेच नामवंत लेखकांना बोलावून ‘संवाद लेखकांशी’ अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात यावा. ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि कथाकथन, माहितीपट व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावे. मराठी विकीपिडियावर लेखन करण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे, असे या शासन निर्णयात सुचविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, मराठी भाषेबाबत सर्वसामान्यांमध्ये तसेच सर्व स्तरावर चांगल्या प्रकारे जागरूकता निर्माण करण्यासाठी संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच खासगी दूरचित्रवाहिन्या या प्रसार माध्यमात दृक्श्राव्य संदेशाचे प्रसारण करण्याचेही सुचविण्यात आले आहे.