मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक

By admin | Published: December 5, 2014 12:33 AM2014-12-05T00:33:56+5:302014-12-05T00:33:56+5:30

सर्व विषयातील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता, अनेक विषय मराठीत उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

Marathi language needs to be spoken | मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक

मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक

Next

मुंबई : सर्व विषयातील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्याकरिता, अनेक विषय मराठीत उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. जेणेकरुन, मराठी ज्ञानभाषा होण्याकडे वाटचाल करेल. वास्तव भानातून सकस साहित्यकृतीची निर्मिती होते, असे मत संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, प्रा. उषा तांबे, साठये महाविद्यालयाच्या प्रा. कविता रेगे आदी मान्यवर उपस्थित होते. गोडबोले पुढे म्हणाले की, समाज मानसिकतेचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आपण आपल्या मुलांना वेगळ्या प्रकारचा विचार करण्यास प्रोत्साहन देत नाही. एका चौकटीत त्यांना विचार करण्यास भाग पाडतो. मुलांना चौकटीबाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करा. वेगवेगळ्या अनुभवातून आलेले साहित्य हे श्रेष्ठ असते.
यानंतर संमेलनातील ‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ या सत्रात नेमबाज अंजली भागवत म्हणाली की, आवडत्या क्षेत्रात झोकून देणे आवश्यक असून त्यासाठी ध्येयपूर्तीचा ध्यास घेणे तेवढेच आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करत रायफल शुटींगचा रोमांचकारी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यशाच्या शिखरावर असले तरी आजही नवोदित खेळाडूंबरोबर शिकण्याची संधीही दवडत नाही, असेही तिने आर्वजून सांगितले.
या सत्रानंतर अभिनय देव यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन जीवन, जाहिरात क्षेत्रातील अनुभव तसेच याबाबत घरच्यांचा सहभाग आदी किस्से-गमती अभिनय देव यांनी सांगितल्या. या प्रवासाबद्दल ते म्हणाले, मी अनेक वर्ष जाहिरातक्षेत्रातील बहुमान समजला जाणारा कान्स हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण फायनलपर्यंत पोहोचूनही यश मिळत नव्हते. त्यानंतर मी या पुरस्काराचा विचार सोडून दिला तेव्हा त्यावर्षी मला हा पुरस्कार प्राप्त झाला. जेव्हा एखाद्या गोष्टीमागे धावतो, तेव्हा ती कधीच मिळत नाही. तिचा विचार करणे सोडतो तेव्हा ती आपोआप आपल्याला मिळते. एखादा निर्णय घेताना सर्वांचे मत जाणावे, पण निर्णय मात्र घेताना आपल्या मनाचेच ऐकावे असा सल्ला अभिनय यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Marathi language needs to be spoken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.