शिवराज्याभिषेकाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन
By स्नेहा मोरे | Published: December 30, 2023 09:54 PM2023-12-30T21:54:07+5:302023-12-30T21:54:19+5:30
सोशल मीडियावरील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, इंटरनेट मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई - यंदा राज्यात २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन वैशिष्ट्यपूर्ण मध्यवर्ती संकल्पनेवर आधारलेला असणार आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा म्हणून ' ३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा ' या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
यंदा मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार, जतन व संवर्धन या धोरणाशी सुसंगत पारंपारीक पध्दतीने कार्यक्रम करण्याबरोबरच त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध माध्यमांचा वापर करावा अशा सूचना मराठी भाषा विभागाने दिल्या आहेत. तसेच, यंदा छत्रपती शिवाजी महाराजावरील पुस्तकांचे, साहित्याचे अभिवाचन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र अशा विविध विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठी भाषा व साहित्य योगदान देणाऱ्या स्थानिक पातळीवरील मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक, साहित्यीक यांची त्या-त्या जिल्हयातील मराठी भाषा समितीने निवड करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करुन गौरव करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयांनी करावे असे शासन निर्णयात म्हटले आहे. सोशल मीडियावरील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, इंटरनेट मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे.