Join us

अमराठी भाषिकांना मराठीचे धडे; मुंबई मराठी साहित्य संघाच्या शिकवणी पुन्हा होणार सुरु

By स्नेहा मोरे | Published: December 15, 2023 11:14 PM

नव्या स्वरुपात हा प्रशिक्षण अभ्यासक्रम नवीन वर्षात अमराठी भाषिकांसाठी सुरु होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने मागील तब्बल साठ वर्षांपासून अमराठी भाषिकांना मराठी भाषेचे धडे देण्यासाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येतो. जागतिक महामारी कोरोना साथीमुळे या प्रशिक्षणात काहीसा खंड पडला होता, मात्र आता पुन्हा एकदा नव्या स्वरुपात हा प्रशिक्षण अभ्यासक्रम नवीन वर्षात अमराठी भाषिकांसाठी सुरु होणार आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाचा हा मराटी भाषा प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून आठवड्यातून एक दिवस रविवारी हा घेण्यात येतो. नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात या प्रशिक्षणाची नवी बॅच सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य संघाने दिली आहे.

या अभ्यासक्रमाचे आॅनलाइन स्वरुपात प्रशिक्षण सुरु होणार असल्याने विद्यार्थी वा नोकरदारांना सोयीचे ठरणार आहे. शिवाय , हा अभ्यासक्रम सरकारमान्य असल्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही मिळणार आहे. यामुळे बाॅलीवूडसह अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघाने केले आहे.

या अभ्यासक्रमाचे धडे प्रा. सुहासिनी किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येतात. तसचे, भाषा क्षेत्रातील विविध तज्ज्ञ या प्रशिक्षणादरम्यान शिकवणीस येतात. तसेच, या प्रशिक्षण अभ्यासक्रमाशी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ संलग्न असून त्यात अभिनेता आमीर खान, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा - देशमुख आणि मुंबई विद्यापीठाच्या विभा सुराणा यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :मराठी