मुंबई : मराठी भाषेची सातत्याने होणारी अवहेलना लक्षात घेऊन ‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठा’ची निर्मिती करण्यात आली. या व्यासपीठांतर्गत आज, सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वेळेत आझाद मैदानात आंदोलन छेडले जाणार आहे.यात राज्यभरातील २४ साहित्य-संस्कृतीविषयक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक संघटना, साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणारआहेत.या धरणे आंदोलनादरम्यान सोमवारी १३ जणांचे शिष्टमंडळ मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती व्यासपीठाचे प्रमुख कार्यवाह चंद्रशेखर गोखले यांनी दिली.याखेरीज, आंदोलनात नागनाथ कोतापल्ले, मधू मंगेश कर्णिक, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. दीपक पवार, दिनकर गांगल, वर्षा उसगांवकर, अरुण नलावडे, प्रमोद पवार आदी मान्यवर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या आहेत मागण्या‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठा’मार्फत यापूर्वीच प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यात मराठी शिक्षण कायदा, मराठी शाळांचे सक्षमीकरण, शालेय ग्रंथालय समृद्ध करणे, मुंबईत मराठी भाषा भवन स्थापन करणे, मराठी भाषा अभिजात आहे, हे गृहीत धरून निधीची तरतूद करणे आणि मराठी शाळांचा प्रलंबित बृहद्आराखडा लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
मराठी साहित्यिक, अभ्यासक आझाद मैदानात एकवटणार! आज आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 7:03 AM