मराठीप्रेमी पालक संमेलन १८ ते २१ डिसेंबरला, देश-परदेशातील मराठीप्रेमींचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 03:28 AM2020-12-12T03:28:46+5:302020-12-12T08:04:16+5:30
Marathi News : या संमेलनाआधी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. विजेत्या स्पर्धकांची नावेही संमेलनात जाहीर होणार आहेत.
मुंबई : मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीप्रेमी पालक महासंघ आणि आम्ही शिक्षक यांच्या वतीने प्रतिवर्षी भरवले जाणारे संमेलन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने येत्या १८ ते २१ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.
चार दिवसांचे हे संमेलन ऑनलाइन होणार असून, उपस्थितीवर भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे राज्यातील, तसेच देश-परदेशातील मराठीप्रेमींचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांना आहे. नेहमीप्रमाणे विविध सत्रे व मान्यवरांचा सहभाग असा संमेलनाचा कार्यक्रम आहे.
मुलांना मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्यासाठी पालकांचे प्रबोधन व सक्षमीकरण करण्याच्या हेतूने भरणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटक माध्यमकर्मी मंदार फणसे असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी अभ्यास केंद्राच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटन आणि समारोप यांसह एकूण सहा सत्रांमध्ये विविध मान्यवरांचा सहभाग असणार आहे. ‘मुलांकरिता आम्ही मराठी शाळाच का निवडली?’ हे मराठीप्रेमी पालकांच्या मनोगताचे सत्र, मराठी भाषेतून शालेय शिक्षण घेऊन आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केलेल्या युवा युवतींच्या मुलाखतींचा ‘मराठी शाळांतील यशवंत – एक सुसंवाद’ हा कार्यक्रम , ‘मराठीतून विज्ञान गणित – सद्यस्थिती आणि आव्हाने’ ह्या विषयावर अनुभवी शिक्षकांची चर्चा, ‘मराठी शाळा आणि कला-क्रीडा शिक्षण’ या विषयावर कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवरांचे विचारमंथन असे या संमेलनाचे स्वरूप आहे. समारोपाच्या सत्राला मराठी शाळा, तसेच मराठी भाषेच्या प्रसाराचे काम करणारे आणि ऑस्ट्रेलियात वास्तव्य असलेले प्रसाद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार मांडणार आहेत.