"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:29 PM2024-11-05T12:29:18+5:302024-11-05T13:19:53+5:30
मराठी माणसांना घर नाही, मराठी माणसाने नोकरी मागू नये अशा घटना सातत्याने मुंबई परिसरात घडत असल्याचं समोर आले आहे. आता नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
नालासोपारा - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील टीसी रितेश मोर्या याने एका मराठी प्रवासाला धमकावून त्याच्याकडून यापुढे मी मराठीची मागणी करणार नाही असं लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमित पाटील असं मराठी व्यक्तीचं नाव असून या प्रकाराची दखल मराठी एकीकरण समितीने घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे.
याबाबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्याठिकाणी रेल्वे प्रशासनाला संतप्त जाब विचारला. ते म्हणाले की, रितेश मोर्या या तिकिट तपासनीसला निलंबित करावं. मराठी भाषा हा आमच्या अस्मितेचा विषय असून आमच्या मराठी माणसांचा त्याने अपमान केलेला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाने मराठी बोलायचं नाही असं या मुजोर टीसीने लिहून घेतलं. एकनाथ शिंदे निवडणुकीच्या प्रचारात आहेत. मराठी बोलण्याची मागणी करणाऱ्या अमित पाटील यांच्याकडून मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतले. संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी लढा दिला. परप्रांतातून आलेला हा टिसी, आमचे रोजगार हिरावून घेतले, सगळे अधिकारी, कर्मचारी रेल्वेत परप्रांतीय भरले जातात याची लाज प्रशासनाला वाटली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मराठी माणसांना का दिल्या जात नाहीत. तुम्ही अजूनही प्रभारी मुख्यमंत्री आहात. एकनाथ शिंदे निवडणुकीत व्यस्त आहेत. रेल्वेत मराठी बोलण्यास मनाई आहे. मराठी शिलेदार इथं मराठी भाषेसाठी लढतायेत. मराठीची मागणी राज्यात करायची नाही हे आपलं दुर्दैव. १२ कोटी मराठी माणसांचे राज्य मात्र बाहेरून येऊन आम्हाला हे मराठी बोलू नका सांगतात. हा आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुजोरी आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. सर्वसामान्य मराठी माणूस पेटला आहे असं गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वेत ज्या काही भरती होती ते महाराष्ट्रातल्या मुलांना कळवले जात नाही. मनसेनं अनेकदा यावर आंदोलन केले आहे. स्थानिक वृत्तपत्रात या जाहिराती येत नाहीत. बाहेरच्या राज्यातील मुलांना या जाहिराती येतात त्यानंतर ते इथं नोकरीला येतात. मराठी मुलं रेल्वेत नोकरीला लागावी यासाठी शासनाने ठोस उपाययोजना केली पाहिजे. रेल्वेतील भरती ज्या ज्या राज्यात असतील तिथे स्थानिकांना प्राधान्य द्यायला हवं. मनसे ही मागणी वारंवार करते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून पाऊले उचलली जात नाहीत. सरकार याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर हे जे भरती होतात, त्यांना मराठी येत नाही, मराठी शिकत नाहीत, त्यानंतर मराठी बोलणाऱ्यांसोबत उद्धट बोलतात. शासनाने ठोस भूमिका ठरवायला हवी. मनमानी कारभार सुरू आहे. ठोस भूमिका घ्यायला कुणी तयार नाही. मराठी माणसांसाठी लढणारी आणि संघर्ष करणारी मनसे आहे. सत्तेत बसणारा पक्ष आहे त्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनतेने त्यांना सत्तेतून उतरवायला हवं अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.