शिक्षकांच्या मुलांचे माध्यमही मराठीच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:02 AM2018-12-02T03:02:07+5:302018-12-02T03:02:25+5:30
मराठी शाळा वाचविण्यासाठीची चळवळ सध्या जोरात सुरू आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : मराठी शाळा वाचविण्यासाठीची चळवळ सध्या जोरात सुरू आहे. मात्र या चळवळीत भाग घेणाऱ्या किती शिक्षकांची स्वत:ची मुले मराठी माध्यमांत शिकवली जातात, असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. याला उत्तर म्हणून ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’ या फेसबुक समूहातील सदस्यांनी ‘चेंबूर हायस्कूल’चे उदाहरण देत आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. या शाळेतील २० शिक्षक आपल्या मुलांना मराठी शाळेतूनच शिकवत असल्याची माहिती चेंबूर हायस्कूलच्या शिक्षिका व समूहाच्या सदस्या अनिता लुगडे यांनी दिली.
मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत या समूहातून शिक्षणतज्ज्ञ, विचारवंतांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी सांगितले आहे. पण मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत का, असा प्रश्न समूहातील सदस्यांना विचारला गेला. यावर ज्या शिक्षकांची मुले मराठी माध्यमात शिकली किंवा शिकत आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. यालाच जोड म्हणून चेंबूर हायस्कूलमधील अनिता लुगडे यांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील शिक्षकांची माहिती दिली. शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनाही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकल्यामुळे त्यांना अभ्यासात काही अडचण न येता उलट फायदाच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.