नाट्यसंमेलनाची आज मुंबईत नांदी, सलग ६० तासांचे कार्यक्रम हेच आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:30 AM2018-06-13T06:30:03+5:302018-06-13T06:30:03+5:30
तब्बल २५ वर्षांनी मुंबईला मिळालेला मान, शतकमहोत्सवी संमेलनाची होणारी नांदी, वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीचे आकर्षण आणि सलग ६० तास चालणारे कार्यक्रम अशा वातावरणात बुधवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद््घाटन होणार आहे.
मुंबई - तब्बल २५ वर्षांनी मुंबईला मिळालेला मान, शतकमहोत्सवी संमेलनाची होणारी नांदी, वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीचे आकर्षण आणि सलग ६० तास चालणारे कार्यक्रम अशा वातावरणात बुधवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद््घाटन होणार आहे.
या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून बाहेरगावचे रसिक, कलावंत कार्यक्रमस्थळी दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते सायंकाळी या नाट्यसंमेलनाचे उद््घाटन होईल. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या कार्यकाळातील हे पहिलेच नाट्यसंमेलन आहे. ९७ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर अध्यक्षपदाची सूत्रे संगीत रंगभूमीवर प्रदीर्घ कारकिर्द गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्याकडे सूपर्द करतील.
प्रियदशिर्नी क्रीडासंकुलात तीन हजार आसनक्षमतेचा शामियाना उभारला आहे. मुलुंडचे रहिवासी आणि ज्येष्ठ लोककलाकार अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा संगीतमय आविष्कार सकाळी सादर होईल. मुलुंड शहरातून दुपारी भव्य नाट्यदिंडी काढली जाईल. त्यात ४०० लोककलावंत महाराष्ट्रातील तब्बल १६ लोककला सादर करतील. मुलुंड स्टेशनपासून सुरू होणाऱ्या दिंडीची सांगता कालिदास नाट्यगृहातील संमेलनस्थळी होईल. रात्री ९ वाजता संगीत सौभद्र नाटकाचा प्रयोग होईल. गुरूवार उजाडताना मध्यरात्री पंचरंगी पठ्ठेबापूराव सादर करण्यात येणार आहे. पहाटे तीन वाजता ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना समर्पित असणारा ‘रंगबाजी’ हा बहारदार कार्यक्रम रंगेल. गुरूवारी सकाळी ६ वाजता राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांची सुरेल मैफल प्रात:स्वर या कार्यक्रमात पार पडेल.
आज मध्यरात्री दीड वाजता विशेष ट्रेन
मुंबई : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने ९८व्या मराठी नाट्यसंमेलनासाठी बुधवारी मध्यरात्री ठाणे-सीएसएमटी मार्गावर १ वाजून ३५ मिनिटांनी ‘संमेलन विशेष’ लोकल धावणार आहे. १४, १५ आणि १६ तारखेला (तीन दिवस) ही ‘संमेलन विशेष’ लोकल रसिकांच्या सोईसाठी चालविण्यात येईल. ही लोकल ठाणे स्थानकातून मध्यरात्री
१ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.