Join us

 २३ आणि २४ डिसेंबर रोजी मुंबईत ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 3:16 PM

मराठी अभ्यास केंद्र आणि शीव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  सजग आणि सुजाण नागरिकत्वासाठी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. 

मुंबई: मराठी अभ्यास केंद्र आणि शीव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  सजग आणि सुजाण नागरिकत्वासाठी ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. दिनांक २३ आणि २४ डिसेंबर(शनिवार- रविवार) रोजी डी. एस. हायस्कूल, एम. डी. कुलकर्णी मार्ग, गुरूकृपा हॉटेलशेजारी, शीव (सायन) पश्चिम, मुंबई २२ या ठिकाणी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे संमेलन होणार आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे पालकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.

मातृभाषेतून शिकल्याने विद्यार्थ्याची आकलनक्षमता वाढते. बौध्दिक, मानसिक, सांस्कृतिक आणि भाषिक असा सर्वांगीण विकास होतो, हे जगभर मान्य झालेलं आहे. असे असतानाही इंग्रजी ही काळाची गरज आहे म्हणत आणि केवळ प्रतिष्ठेपायी आज मराठी शाळांकडे पालक पाठ फिरवत आहे. इंग्रजी भाषा ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकता येते या गैरसमजुतीमुळेही अनेक पालक इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, अद्ययावत सुविधांनी आणि अधिक गुणवत्तापूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीने मराठी शाळा परिपूर्ण करणं ही दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत संस्थाचालक, शिक्षक हे नेहमीच मोलाची भूमिका पार पाडत असतात. त्यांच्याचबरोबरीने आता पालकांनीही सक्रीय भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र त्याकरता पालकांना योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्यांचं संघटन निर्माण होणं आवश्यक आहे. या उद्देशाने हे मराठीप्रेमी पालक महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सध्या वेगाने सुरू आहेत. या पार्शवभूमीवर या संमेलनातून मराठी पालकांचा आवाज बुलंद करण्याला विशेष महत्व प्राप्त होणार आहे.

मराठी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, अभ्यासक यांना उपयोगी पडेल असे शिक्षणतज्ज्ञ, लेखिका डॉ. वीणा सानेकर यांनी संपादित केलेले मराठी शाळांवरील विशेष पुस्तक या संमेलनात प्रसिध्द होणार आहे. राज्यातील पाच हजाराहून अधिक मराठी शाळा डिजीटल करणारे हर्षल विभांडीक हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मॅक्सीन बर्न्टसन (मॅक्सीन मावशी) या संमेलन समारोपाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ‘मराठी शाळा’ या विषयावर चिंतनशील कलात्मक मांडणी करणाऱ्या ‘घुमा’ या चित्रपटाचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कोल्हापूरची सृजन आनंद, नाशिकची आनंद निकेतन, रत्नागिरीचे टिळक विद्यालय इ. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रयोगशील शाळांचे उपक्रम दाखविणारी दालने या संमेलनात पहायला मिळणार आहेत. तर राजहंस, ज्योत्स्ना, साहित्य अकादमी, ग्रंथाली, राज्य मराठी विकास संस्था अशा महत्वाच्या प्रकाशकांचे ग्रंथप्रदर्शनही या संमेलनात भरविण्यात आले आहे. चर्चासत्रे, मुलाखती, संवादात्मक स्वरूपातील कार्यक्रम अशा एकूण आठ सत्रांमधून अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, कला/नाट्य/साहित्य क्षेत्रातले दिग्गज आणि राजकीय नेते उपस्थिती लावणार आहेत. संदेश विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय, मालवणी उत्कर्ष विद्यालय आणि डी. एस. हायस्कूल या मुंबईतील शाळांचे सांस्कृतीक कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत.

पहिल्या दिवशी होणाऱ्या 'मातृभाषेतील शिक्षण आणि पालकांशी संवाद' या सत्रात मुक्ता दाभोलकर, नामदेव माळी हे पालकांशी संवाद साधणार आहेत तर ज्ञानरचनावादाचे प्रणेते आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे हे अध्यक्षस्थानी आहेत. 'विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका' या सत्रातून आयपीएच (इंस्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) या संस्थेचे सुरभी नाईक, अरूण नाईक हे पालक, शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. 'गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी' या सत्रात महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे महत्व आणि उपक्रम याबाबत रेणू दांडेकर (टिळक विद्यालय, दापोली), सुचिता पडळकर (सृजन आनंद शाळा, कोल्हापूर) आणि आदिती नातू (ग्राममंगल शाळा, पुणे) बोलणार आहेत. मुंबईतील एक प्रयोगशील शाळा असलेली अ. भि. गोरेगावकर या शाळेचे विश्वस्त गिरीश सामंत या सत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. मराठी शाळेत शिकूनही नोकरी, व्यवसाय, उद्योगाच्या उच्च पदावर पोहचलेल्या अनेक नामवंतांचे अनुभव 'मराठी माध्यमातील यशवंतांच्या यशोगाथा' या सत्रात ऐकायला मिळणार आहेत. यामध्ये सहाय्यक आयुक्त राज्यकर पदावरील स्वाती थोरात, वृत्तनिवेदक नम्रता वागळे, ‘अस्मिता’फेम मयूरी वाघ, आशियाई महिला कबड्डीपट्टू विजेता संघाच्या सायली जाधव, भारतीय बनावटीचे विमान बनविणारे अमोल यादव, सिमेन्स कंपनीतील इलेक्ट्रीकल इंजिनीयर वैभव पटवर्धन आणि डॉक्टर सुमीत शिंदे सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात 'शालेय जीवनातील भाषा, कला आणि क्रिडासमृद्धी' या विषयावर विद्यार्थ्यांच्या आवडत्या माधुरीताई पुरंदरे आणि उदय देशपांडे हे पालकांशी संवाद साधणार आहेत. 'मातृभाषेतील शिक्षण आणि आई म्हणून माझी भूमिका' या सत्रात आपल्या मुलांच्या शिक्षणाचे माध्यम निवडताना कोणत्या गोष्टींना महत्व दिले या विषयी बहुजनवादी ज्येष्ठ नेत्या रेखा ठाकूर, संपादक आणि लेखिका मीना कर्णिक, अभिनेत्री चिन्मयी सुमीत आपली मते मांडणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरहे आहेत तर वयम् मासिकाच्या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार शुभदा चौकर यां सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. 'मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नाविण्यपूर्ण उपाय' या सत्रात मराठी शाळांबाबत शासनाची भूमिका या विषयावर संस्थाचालक मारूती म्हात्रे आणि शिक्षण हक्क कायद्यातील पालकांचे अधिकार याबाबत हेमांगी जोशी माहिती देणार आहेत. अकोल्याचे भाऊसाहेब चासकर शिक्षकांच्या दृष्टीकोनातून नाविण्यपूर्ण उपाय सुचविणार आहेत तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळांना पूरक काम पालक घरच्या घरी कसे करू शकतात याची माहिती सुबोध केंभावी हे देणार आहेत. शासनाच्या प्रगत महाराष्ट्र शाळा उपक्रमातील राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त डी. एस. हायस्कूलचे प्रमुख आणि शीव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात 'मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार?' या विषयावर राजकीय पक्षांचे आणि प्रसारमाध्यमांचे निवडक प्रतिनिधी बोलणार आहेत. यामध्ये मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि शिक्षक आमदार कपिल पाटील हे सहभागी होणार आहेत. प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्राच्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका प्रतिमा जोशी आणि झी २४ तास वाहिनीचे पत्रकार अजीत चव्हाण हे या सर्वांशी संवाद साधणार आहेत.

दि शिक्षण मंडळ, गोरेगाव, नूतन विद्यामंदिर, गोरेगाव, वंदे मातरम् शिक्षण संस्था, मी मराठी चळवळ समिती, पंचतत्व सेवा संस्था, पालघर, राष्ट्रज्योत, कल्याण, चित्रपतंग शैक्षणिक कला संस्था आणि मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत हा फेसबुक समूह इ. मराठी शाळा, भाषेसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था या महासंमेलनाच्या सहयोगी संस्था आहेत. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिक्षक भारती आणि बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा या राज्यातील शिक्षकांच्या प्रमुख संघटना या संमेलनाला सहकार्य करत आहेत.

टॅग्स :शाळामराठीमुंबई