मराठी माणसाने लोकलमध्येही जपली भजनाची परंपरा

By नितीन जगताप | Published: March 13, 2023 08:52 AM2023-03-13T08:52:48+5:302023-03-13T08:53:21+5:30

मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर एकूण ३७५ भजनी मंडळे आहेत.

marathi people preserved the tradition of bhajan even in the local | मराठी माणसाने लोकलमध्येही जपली भजनाची परंपरा

मराठी माणसाने लोकलमध्येही जपली भजनाची परंपरा

googlenewsNext

नितीन जगताप, प्रतिनिधी

महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. साधूसंतांचा वारसा जपण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो. वारकऱ्यांचा हा वारसा रेल्वे प्रवासी भजनाच्या माध्यमातून जपत आहेत. संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे.

मुंबईत कामानिमित्ताने आलेली व या शहराची झालेली गावातील मंडळी चार-पाच दशकांपूर्वी एकत्र येऊन भजन म्हणत असत. मुंबईत तेव्हा बऱ्याच मोकळ्या जागा असल्याने विविध ठिकाणी भजनाचे कार्यक्रम व्हायचे. मुंबई महानगराचा विस्तार वाढत गेला, या शहरात लोंढे वाढत गेले तशा मोकळ्या जागा कमी झाल्या. हळूहळू लोक उपनगरांमध्ये राहायला गेली. प्रत्येकाची लोकलची वेळ ठरलेली. रोजचे काही प्रवासी ठरलेले. रोज सकाळी कामासाठी ठरल्या वेळेनुसार गाडी पकडणे ठरलेल्या डब्यातून आणि ठरलेल्या जागेवरून प्रवास सुरू झाला. मग काही काळात प्रवाशांचे ग्रुप तयार झाले. सुखदु:खाच्या गोष्टी ते एकमेकांना सांगू लागले. 

एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊ लागले. त्यातील बऱ्याच जणांना भजनाची आवड असल्याने मग लोकलमध्येच विरंगुळा म्हणून भजने म्हणण्यास सुरुवात झाली. यातूनच नवयुवक रेल्वे प्रवाशी भजन मंडळ भांडुप २००१ मध्ये स्थापन झाले. त्यात मग राज्यातील विविध भागांतून आलेली तसेच काही परप्रांतातील मंडळीही सामील होऊ लागले. त्यातून एक मोठे मंडळ उदयास आले. मग काही मंडळींना कल्पना सुचू लागल्या. त्यातून आपल्यासारख्या इतर भजनी मंडळांना सहभागी करून भजन स्पर्धा घेण्यात येऊ लागल्या. भांडूपचे भजनी मंडळ गेली २० वर्षे भजनाच्या स्पर्धा आयोजित करते. त्यातून अनेक नवे चांगले गायक तयार झाले आहेत.

३७५ भजनी मंडळे

मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर एकूण ३७५ भजनी मंडळे आहेत. सर्व मंडळांच्या समन्वयासाठी ‘विठू माउली सेवा समिती’ ही संघटना आहे. यामध्ये शिवरंजनी रेल्वे प्रवासी भजन मंडळ- ठाणे, शिवगर्जना रेल्वे प्रवासी भजन मंडळ- ठाणे, हेरंभ भजन मंडळ- विरार, अष्ठगंध रेल्वे प्रवासी भजन मंडळ- नालासोपारा, नवतरुण रेल्वे प्रवासी भजन मंडळ- डोंबिवली, संतसेवा भजन मंडळ- वाशी, भक्ती संगम रेल्वे भजन मंडळ - अंबरनाथ आदी मंडळांचा समावेश आहे.

सहप्रवाशांना त्रास न देता आम्ही विठ्ठलाची सेवा चालू ठेवली आहे. भजनांचा एक नियम आहे की, अभंग किंवा गौळण सकल संथ गाथातील असावी यातून वारकरी संप्रदायाला पुढे कसे नेता येईल व संतांचे विचार समाजापर्यंत कसे पोचतील, यासाठी हा प्रयत्न आहे. - राजेश पालकर, अध्यक्ष, नवयुवक रेल्वे प्रवासी भजन मंडळ

लोकलमध्ये भजन गाताना  राम कृष्ण हरी,  सुंदर ते ध्यानने  सुरुवात केली जाते. सर्व साधारणपणे  संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम माउली यांचीच भजने असतात. वारानुसार सोमवारी भगवान शंकरांचे, गुरुवारी साईबाबांची भजने म्हटली जातात.भजन गात असताना भजनाचे साहित्य ठेवण्याची व्यवस्था नसल्याने  दिवसभर ते सोबत ठेवावे लागते. - खंडू दाते, संस्थापक, विठू माउली सेवा समिती

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: marathi people preserved the tradition of bhajan even in the local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.