अमेरिका, यूके, आॅस्ट्रेलियातही होतोय मराठीचा प्रचार, प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:31 AM2018-11-25T01:31:11+5:302018-11-25T01:31:21+5:30

मातृभाषेतील शिक्षणाला पाठिंबा : ‘मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत’चे सदस्य परदेशांतही

Marathi, promotion, dissemination, spread in America, UK and Australia | अमेरिका, यूके, आॅस्ट्रेलियातही होतोय मराठीचा प्रचार, प्रसार

अमेरिका, यूके, आॅस्ट्रेलियातही होतोय मराठीचा प्रचार, प्रसार

Next

- सीमा महांगडे


मुंबई : मराठीपेक्षा इंग्लिश शाळांमधील शिक्षण उत्तम असते. मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. हा समज दूर करण्यासाठी आणि मराठी शाळांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी, यासाठी फेसबुकवर मराठी शाळा टिकविल्या पाहिजेत, हा फेसबुक समूह फेसबुकवर काही मराठी प्रेमींनी सुरू केला. आज जगभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या फेसबुक समूहाचे जगभरात ५७ हजार ७०९ सदस्य आहेत.


प्रसाद गोखले यांनी मराठी शाळा टिकाव्यात, यासाठी साडेचार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यामातून या फेसबुक समूहाची सुरुवात केली. सध्या भारतातीलच नाही, तर अमेरिका, सौदी अरब, आॅस्ट्रेलिया, जर्मनी, कतार, म्यानमार, व्हिएतनाम, इजिप्त, नायजेरिया, ओमन, कॅनडा, बांगलादेश या देशांतील मराठीप्रेमी या समूहाचे सदस्य आहेत. या माध्यमातून ते मराठी शाळांना व मातृभाषेतील शिक्षणाला आपला पाठिंबा दर्शवित आहेत.


राज्यातील मराठीप्रेमी पालकांमधून सगळ्यात जास्त सुमारे २० हजार इतके पालक मुंबईतील आहेत. त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. त्यांची समूहातील संख्या जवळपास ६ हजार आहे. यानंतर, सदस्यत्त्वाच्या आकडेवारीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक, डोंबिवली, औरंगाबाद यांचा क्रमांक येतो. सोबतच बदलापूर, कोल्हापूर, विरार, भिवनदी, नांदेड येथील मराठी प्रेमीही या समूहाचे सदस्य आहेत. मागील २८ दिवसांत ८५७ नवीन सदस्य समूहांत सामील झाल्याची माहिती प्रसाद गोखले यांनी दिली. यामुळे मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार आणि मराठी शाळांचे महत्त्व या फेसबुकवरील समूहाच्या चळवळीमुळे अधोरेखित होत असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न
फेसबुक समूहांत असलेल्या एकूण सदस्यांपैकी १९ टक्के सदस्य या महिला, तर ८१ टक्के सदस्य पुरुष आहेत. उच्च पदावरील अनेक माणसे मराठीतच शिकली असून, यशस्वी झाल्याचे दाखले या ग्रुपवरून देण्यात आले आहे. या माध्यमातून मराठी शाळांबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Marathi, promotion, dissemination, spread in America, UK and Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी