Join us

रिक्षा चालकांना मराठीचे वावडे

By admin | Published: March 02, 2016 1:43 AM

रिक्षाचालकांना रिक्षा परमिट मिळण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने मौखिक चाचणी घेण्याचे काम २७ फेब्रुवारीपासून सुरू केले आहे

नामदेव पाषाणकर ,  घोडबंदररिक्षाचालकांना रिक्षा परमिट मिळण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने मौखिक चाचणी घेण्याचे काम २७ फेब्रुवारीपासून सुरू केले आहे. तीन दिवसांत घेतलेल्या चाचणीत जवळपास ३ हजार ६०० उमेदवारांची चाचणी पार पडली. त्यामध्ये ५०० जणांना मराठीचा गंध नसल्याचे समोर आले. त्यांना परमिट दिलेले नाही. १५ वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहणाऱ्या या रिक्षावाल्यांना मराठी येत नसल्याने त्यांना देण्यात येत असलेल्या वास्तव्याच्या दाखल्यांवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे मुळात महाराष्ट्रातील मुस्लीम रिक्षाचालकांना उर्दू शिक्षणामुळे मराठी बोलता येते. मात्र, मराठी वाचता येत नसल्याची बाब समोर आली.रिक्षा परमिट देताना प्रथमच पत्रकारांकडून मौखिक चाचणी घेण्यात येत आहे. परिवहन विभागाचे निरीक्षक आणि पत्रकार यांनी संयुक्तिक घेतलेल्या चाचणीमुळे अनेक गमतीदार किस्से पाहायला मिळाले. ही चाचणी रेकॉर्ड होत असल्याने पारदर्शीपणा आलेला दिसतो. तुमचे शिक्षण किती, ४९ म्हणजे किती, मराठी वाचता, लिहिता येते का, असे काही प्रश्न करता सदर रिक्षाचालक गोंधळून जात. ठाण्यात कधी आले, त्यातून मिळणाऱ्या उत्तरातून १५ वर्षे पूर्ण न झालेल्या रिक्षावाल्यांना वास्तव्याचे दाखले देण्यात गडबड झाल्याचे दिसून येत होते. काही जणांना तोडकीमोडकी मराठी बोलता येत होती, तर वाचता येत नव्हते. काहींना वाचता येत होते, तर बोलता येत नव्हते. ही सर्व मराठी बोलण्यातील अडचण मराठी नसलेल्या रिक्षावाल्यांना येत होती. काही बिगर मराठी चांगल्या पद्धतीने मराठीचा वापर करत असल्याने त्यांना हे परवाने देण्यात अडचण नव्हती.काही ज्येष्ठ नागरिकदेखील डोळ्यांची शस्त्रक्रि या केल्यानंतरदेखील परवाना घेण्यासाठी रांगा लावून होते. परमिट पोटाचे साधन असल्याने अनेकांची धडपड दिसत होती. ३ मार्चपर्यंत या चाचण्या होणार असून त्यामध्ये १९ हजारांवर रिक्षाचालकांच्या चाचण्या पार पडणार आहेत.