Join us

मुंबईतील मराठी शाळांचाही विकास करायला हवा, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 2:38 AM

Education News : राज्य सरकारने राज्यातील  ३०० निवडक शाळा विकसित करून त्यांना आदर्श शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.  यावर अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई :  एकीकडे राज्यातील विशेषतः मुंबईतील अनेक मराठी शाळा मरणपंथाला टेकलेल्या असताना दुसरीकडे राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडक ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणार आहेत. मग या आदर्श शाळांच्या यादीत जिल्हा परिषदेच्या शाळांसह मुंबईतील अनुदानित मराठी शाळांचा समावेश का केला जात नाही, असा प्रश्न मराठीप्रेमी पालक आणि शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. यामुळे अनुदानित मराठी शाळांना चांगला भौतिक व शैक्षणिक दर्जा प्राप्त होऊन विद्यार्थी, पालक मराठी शाळांकडे वळू शकतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.  राज्य सरकारने राज्यातील  ३०० निवडक शाळा विकसित करून त्यांना आदर्श शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.  यावर अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील अनेक अनुदानित शाळाना पायाभूत सुविधा नीट मिळत नाहीत,  वेतनेतर अनुदान मिळत नसल्याने इतर मंडळांच्या शाळांप्रमाणे शैक्षणिक सुविधाही देता येत नाहीत. परिणामी, या शाळांतील विद्यार्थी संख्या घटते आहे. या अनुदानित शाळामध्ये मराठी शाळांची संख्या जास्त आहे. अनुदान नसल्याने आणि आवश्यक भौतिक सुविधा नसल्याने संस्थाचालकांवर शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी तर मराठी माध्यमाच्या तुकड्या बंद करून  आणि इंग्रजी माध्यमांचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे अभ्यासक्रमातील मराठी भाषासक्तीसाठी सरकार प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात मुंबईसारख्या शहरातील अनुदानित मराठी शाळांना वगळले जात आहे. जर मराठी शाळाच नसतील तर केवळ विषय म्हणून मराठीसक्ती करण्यात अर्थ काय, असा प्रश्न शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे त्यांनी मुंबई आणि उपनगरात सर्व मराठीसह इतर माध्यमांच्या अनुदानित शाळा टिकून ठेवण्यासाठी आदर्श जिल्हा परिषद शाळा योजनेत मुंबईतील वेगवेगळ्या अनुदानित शाळा घ्याव्यात आणि विद्यार्थी संख्या टिकून ठेवाव्यात अशी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे  केली आहे. 

 300निवडक शाळा विकसित करून त्यांना आदर्श शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सगळ्याच शाळा आदर्श शाळा का नाहीत ? यासोबतच सरकारचा निर्णय चांगला असला तरी तो मोजक्या व निवडक शाळांसाठी का? राज्यातील सर्वच शाळांना उत्तम भौतिक सुविधा व शैक्षणिक दर्जा प्राप्त व्हायला हवा, असे मत शिक्षक व्यक्त करत आहेत.   यामुळे विद्यार्थी आहेत त्याच शाळॆत शिक्षण घेऊन आपला विकास साधू शकतील आणि त्यांना या शाळांमध्ये स्थलांतरित होण्याची किंवा आधीच्या आजूबाजूच्या शाळा बंद करण्याची गरज भासणार नाही.  मात्र या आदर्श शाळा स्कूल कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर विकसित करण्यात येत असून आसपासच्या परिसरातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :शाळाशिक्षण क्षेत्रमहाराष्ट्र सरकार