लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक विभागातील कारभार मराठीत झाला पाहिजे. बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाची अंमलबजावणी व्हायला हवी, असे सांगतानाच मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात गुरुवारी मंत्रालयातील कार्यक्रमाने झाली. केवळ एक दिवस गोड गोड बोला असे नसून कायमच आपल्याला मराठीचा गोडवा पुढे नेऊन तो जपायचा आहे. केवळ ‘बोलतो मराठी’ म्हणून चालणार नाही तर आपल्या रोजच्या शासन कारभारात ‘वापरतो मराठी, आग्रह धरतो मराठी’ असा उल्लेख केला पाहिजे, असे देसाई या वेळी म्हणाले.
या कार्यक्रमास राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सचिव प्राजक्ता लवंगारे, जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहसचिव मिलिंद गवादे तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, वरिष्ठ साहाय्यक संचालक डॉ. सुरेखा मुळे, वरिष्ठ साहाय्यक संचालक अर्चना शंभरकर, लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, सहसचिव विवेक दहीफळे, उपसचिव नगरविकास सतीश मोघे, उपसचिव प्रशांत रांजणीकर, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी वंदना जैन, सहसचिव सतीश जोंधळे, कक्ष अधिकारी संजय जाधव यांना देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
......................