Join us  

‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन बुधवारपासून, वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 7:16 AM

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, परदेशातील ६२ उद्योजक,  परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, राज्यातील १६४ नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न होणार आहे. मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे ४ ते ६ जानेवारी या कालावधीत ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली.  

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, परदेशातील ६२ उद्योजक,  परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, राज्यातील १६४ नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. परेदशातील निमंत्रित उद्योजकांसमवेत संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ६ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई