मुंबई : शास्त्रीय किंवा तांत्रिक माहिती असलेला मजकूर इंग्रजीतून हिंदीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. गणेश रामकृष्णन यांनी ‘उडान’ प्रकल्पाची सुरुवात केली. यासाठी प्रा. गणेश आणि त्यांच्या चमूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा विकसित केली आहे.
तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या एखाद्या चमूला अनुवाद करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या एकषष्टांश वेळेत अभियांत्रिकीची पाठ्यपुस्तके आणि अभ्यास साहित्य अनुवादित करण्याची क्षमता नव्याने विकसित झालेल्या यंत्रणेत आहे. अशा प्रकारे सर्व अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचा अनुवाद करता येईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान भारतीय भाषांमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे लक्षात येताच प्रा. गणेश आणि त्यांच्या चमूने सात वर्षांपूर्वी ‘उडान’ प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली.
वाढते शहरीकरण, तसेच जागतिकीकरण यामुळे इंग्रजी भाषेचे प्रस्थ वाढले आहे. विविध क्षेत्रांतील शास्त्रीय तसेच तांत्रिक माहिती इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी न जपणारा मोठा वर्ग या ज्ञानापासून वंचित आहे. याच परिस्थितीचा विचार करून ‘उडान’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ५०० पुस्तके एका वर्षात हिंदीत आणि तीन वर्षांत इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्याचे ध्येय आहे.