कन्नडिगांच्या महाविद्यालयाला मराठीचे वावडे; मिळेना मराठीत प्रश्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 08:54 AM2022-09-19T08:54:41+5:302022-09-19T08:55:20+5:30

चेंबूरमधील कॉलेजकडून विद्यार्थ्यांची कोंडी; मिळेना मराठीत प्रश्नपत्रिका

Marathi Vavda to Kannadigas college; Mudena Question Paper in Marathi | कन्नडिगांच्या महाविद्यालयाला मराठीचे वावडे; मिळेना मराठीत प्रश्नपत्रिका

कन्नडिगांच्या महाविद्यालयाला मराठीचे वावडे; मिळेना मराठीत प्रश्नपत्रिका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांना परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना इंग्रजीबरोबरच मराठी भाषेचा पर्याय देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कन्नड भाषकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या चेंबूर कर्नाटक संघ या संस्थेच्या अधिपत्याखालील ‘चेंबूर-कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ’ या महाविद्यालयाने विद्यापीठाच्या या नियमाला बगल दिली आहे. विधी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राची अंतर्गत परीक्षा इंग्रजीतूनच देण्यात यावी, असा फतवा महाविद्यालयाने काढला आहे. त्यामुळे मराठी भाषक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. 

महाविद्यालयात दुसऱ्या सत्राची अंतर्गत परीक्षा १३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, २१ तारखेपर्यंत ती चालणार आहे. अंतर्गत परीक्षा ही फक्त इंग्रजीमध्येच घेण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यासंदर्भात १८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत ही परीक्षा मराठीमध्ये घ्यावी, अशी विनंती केली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून लावत त्यांना इंग्रजीतून परीक्षा देण्यास सांगितले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी युवासेनेचे (शिंदे गट) सचिन पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची दखल घेत अन्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीमध्ये परीक्षा देण्याची मुभा असताना कर्नाटक महाविद्यालयाचा मनमानी कारभार राज्यपालांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी ओझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना मराठीमध्ये परीक्षा देण्याची सुविधा न मिळणे हे योग्य नाही. विद्यापीठाकडून सूचना असतानाही महाविद्यालयाकडून मराठीला जर दुय्यम स्थान देण्यात येणार असेल तर हा प्रकार निंदनीय आहे. महाविद्यालयाच्या मनमानीविरोधात आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महाविद्यालयावर कारवाई करण्याची विनंती करणार आहोत. 
– सचिन पवार, युवासेना (शिंदे गट)

Web Title: Marathi Vavda to Kannadigas college; Mudena Question Paper in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.